समुद्रातील मच्छीमारांची सुरक्षितता, किनारी सुरक्षा आणि सागरी आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी भारतीय तटरक्षक दलाने ( अलिबाग येथे कम्युनिटी इंटरॅक्शन प्रोग्रॅम (CIP) आणि मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले. या उपक्रमात रायगड जिल्ह्यातील सुमारे १८० मच्छीमारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समुद्रातील सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याबरोबरच मच्छीमारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.
या कार्यक्रमाला रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे उपआयुक्त नागनाथ भडुळे, विविध मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी मच्छीमारांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला.
कार्यक्रमात किनारी सुरक्षा, समुद्रातील सुरक्षित प्रवास, हवामानाचा अचूक अंदाज, जीवनरक्षक साधनांचा वापर, मासेमारीदरम्यान घ्यावयाची खबरदारी तसेच समुद्रात कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास त्वरित मदतीसाठी उपलब्ध असलेल्या सर्च अँड रेस्क्यू (SAR) हेल्पलाईन क्रमांक १५५४ विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक मच्छीमाराने हा हेल्पलाईन क्रमांक लक्षात ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले.
याशिवाय समुद्रात अपघात टाळण्यासाठी सुरक्षा नियमांचे पालन, नौकांमध्ये आवश्यक सुरक्षा साहित्य ठेवणे, लाइफ जॅकेटचा वापर आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित भारतीय तटरक्षक दल अथवा संबंधित यंत्रणेला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे किनारी सुरक्षेला अधिक बळ मिळणार असून मच्छीमारही सुरक्षेच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिरात मच्छीमारांची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाने ‘Safety at Sea’ या संकल्पनेला अधिक बळकटी देत मच्छीमारांचे जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी आणि किनारी सुरक्षेला अधिक सक्षम करण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. हा उपक्रम मच्छीमारांमध्ये सुरक्षा आणि सजगतेची भावना अधिक दृढ करणारा ठरला.