व्हीआयपी कोट्यातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार उघड; आंतरराज्यीय टोळीतील सहा जण अटकेत

अमुलकुमार जैन |
व्हीआयपी कोट्यातून रेल्वे तिकिटे मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या बनावट लेटरहेडचा वापर करून बोगस शिफारसपत्रे तयार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह सहा जणांना अटक करण्यात आली असून, मुंबई, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथे ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२५ मध्ये लोकसभेच्या कार्यालयातून काही बनावट शिफारसपत्रांच्या आधारे व्हीआयपी कोट्यातून रेल्वे तिकिटे मिळविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपासादरम्यान ही पत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे टोळीचा माग काढला. मुख्य आरोपी अमरीश ठक्कर याच्यासह तारिक खान, दीपककुमार यादव, विनोद ठाकूर, बिंदुजुन यादव आणि अनुज उर्फ मोहन अर्शी या सहा जणांना अटक करण्यात आली.
चौकशीत आरोपी विविध खासदारांच्या बनावट लेटरहेडवर शिफारसपत्रे तयार करून रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यातून तिकिटे मिळवत असल्याचे उघड झाले. त्यानंतर ही तिकिटे प्रवाशांना जादा दराने विकून मोठा आर्थिक फायदा मिळवला जात होता. प्रत्येक तिकिटामागे कमिशनही घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून लॅपटॉप, मोबाईल फोन, प्रिंटर, क्रेडिट-डेबिट कार्ड, अनेक खासदारांची बनावट लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड, रबर स्टॅम्प तसेच बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत. तपासात ही टोळी संघटित पद्धतीने अनेक दिवसांपासून हा गैरप्रकार करत असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, देशभरात अशा प्रकारे किती बोगस तिकिटे काढण्यात आली, आणखी किती जणांचा या रॅकेटमध्ये सहभाग आहे आणि रेल्वे व्यवस्थेला किती आर्थिक फटका बसला याचा शोध पोलिस घेत आहेत.