ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या सुधागड तालुकावासियांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विद्यार्थी दत्तक योजना व यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवारी ठाण्यातील ठामपा शाळा क्रमांक १९, विष्णूनगर (नौपाडा) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी, समाजसेवक आणि देणगीदारांचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजसेवेचा वसा जपणारे ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. श्रीपाद बोडस यांना ‘सुधागड भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रवीण तेलंगे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय अंजली व वसंत केळकर, चंद्रशेखर शिंपी, प्रा. भावेश दिघे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. एमबीबीएस पदवी संपादन करणाऱ्या डॉ. साक्षी सचिन वारंगे, एमपीएससीमध्ये यश मिळवणाऱ्या सपना कांतीराम इंदुलकर तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी आणि इतर क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. बोडस यांनी सुधागड तालुक्यातील दुर्गम भागातील रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमात विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच दहावी, बारावी व पदवी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी सुवर्ण महोत्सवी वाटचालीचा आढावा घेताना गेल्या ५० वर्षांत सुधागड तालुक्यातील १४ शाळा, गरीब, दिव्यांग व गरजू विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. टाटा कॅपिटलच्या CSR माध्यमातून मिळालेल्या सहकार्याचा उल्लेख करत ठाण्यात उभारण्यात येत असलेल्या संस्थेच्या भव्य सभागृहासाठी देणगीदारांनी पुढेही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, देणगीदार, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.