रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वडघर येथे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातर्फे १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला ‘वर्षारंग’ हा आगळावेगळा पावसाळी उपक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ‘जेन झी’च्या उत्स्फूर्त सहभागाने आनंदात पार पडला.
‘वर्षारंग’च्या पहिल्या टप्प्याची सुरुवात ‘साने गुरुजी जीवनदर्शनी’ने झाली. या जीवनदर्शनीतून सहभागींना साने गुरुजींचे जीवनकार्य, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तसेच ‘जगाला प्रेम अर्पावे’ हा त्यांचा मानवतावादी संदेश उलगडून दाखविण्यात आला. गुरुजींच्या विचारांची, मूल्यांची आणि जीवनदृष्टीची प्रेरणादायी ओळख करून देत उपक्रमाची सुरुवात अर्थपूर्ण वातावरणात झाली.
कोकणातील गुडघाभर चिखलात होणाऱ्या पारंपरिक भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोकणातून सहभागी स्मारकात दाखल झाले होते. विशेष म्हणजे, अवघ्या तीन वर्षांच्या बालकांपासून ते ८३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील निसर्गप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात तरुणाईचा वावर कायमच असतो. सध्या देशभर चर्चेत असलेल्या ‘जेन झी’ पिढीचाही ‘वर्षारंग’मध्ये उत्स्फूर्त सहभाग होता. त्यांच्या सळसळत्या ऊर्जा, श्रमसंस्कार स्वीकारण्याची तयारी आणि प्रत्येक उपक्रमातील सक्रिय सहभागामुळे संपूर्ण शिबिराला एक वेगळेच चैतन्य लाभले.
‘वर्षारंग’मधील भातलावणी हा केवळ एक अनुभव नसून अन्नदाता शेतकरी आणि कृषिकर्मी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक संस्कार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सहभागींनी पारंपरिक पद्धतीने भातलावणी करत श्रमसंस्कार, शेतीसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले आपले नाते प्रत्यक्ष अनुभवले.
भातलावणीबरोबरच रानभाज्यांच्या आस्वादाने परिपूर्ण भोजन, पावसाळी कविता-गाणी, चिखलातील खेळ आणि गप्पा-टप्पा यांमुळे उपक्रमाला अधिक रंगत आली.
भातलावणीनंतर संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाड तालुक्यातील बिरवाडी येथील जिजाऊ भजनी मंडळाच्या महिला आणि वनप्रेमी सामाजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी पावसाळी व पर्यावरणपर गीते सादर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वणवामुक्तीसाठी जनजागृती करणाऱ्या वनप्रेमी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲड. किशोर पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात भिवघर येथील आदिवासी वाडीतील कातकरी महिलांनी पारंपरिक भातलावणीची गीते आणि नृत्य सादर करून कोकणच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले.
दुसऱ्या दिवशी २ ऑगस्टला सकाळी पर्यावरण अभ्यासक मल्हार इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारक परिसरात निसर्गभ्रमंती आयोजित करण्यात आली. या भ्रमंतीत सहभागींना परिसरातील जैवविविधता, विविध वनस्पती, पक्षी आणि स्थानिक पर्यावरणीय वैशिष्ट्यांची माहिती देण्यात आली. निसर्गाशी नाते दृढ करणे आणि जैवविविधता संवर्धनाविषयी जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
निसर्ग, शेती, लोकसंस्कृती आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या ‘वर्षारंग’ उपक्रमामुळे सहभागी भारावून गेले. शहरातील धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून ग्रामीण जीवन, श्रमसंस्कार आणि निसर्गाशी नव्याने नाते जोडण्याची संधी या उपक्रमातून मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पुढील आयुष्याला ऊर्जा देणारा आणि अविस्मरणीय ठरणारा हा उपक्रम राबवल्याबद्दल सहभागींनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
उद्घाटनप्रसंगी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रमोद निगुडकर, जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. संजय मं. गो., स्मारकाच्या विश्वस्त प्रा. शारदा गांगुर्डे, विश्वस्त सिरत सातपुते तसेच रुईया महाविद्यालयाचे प्रा. प्रतिक पवार उपस्थित होते.
निसर्ग, श्रमसंस्कार, पर्यावरण-जागर आणि लोकपरंपरेचा अनुभव देणारा ‘वर्षारंग’ प्रत्येक सहभागीच्या मनात चिरंतन आठवणी कोरणारा ठरला.