Panvel : अमरधाम स्मशानभूमीचा मुद्दा महासभेत गाजला; स्थलांतराच्या कोणत्याही प्रयत्नाला शिवसेनेचा तीव्र विरोध

पनवेल मनपातील शहर अभियंता पदावरून वाद
पनवेल | प्रतिनिधी 
पनवेलमधील अमरधाम स्मशानभूमीतील नादुरुस्त शवदाहिनीमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीचा मुद्दा पनवेल महापालिकेच्या महासभेत पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. शवदाहिनीचे आधुनिकीकरण तातडीने करावे, तसेच स्मशानभूमीचे स्थलांतर किंवा बंद करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला शिवसेना कडाडून विरोध करेल, अशी ठाम भूमिका पक्षाच्या नगरसेवकांनी महासभेत मांडली.
अमरधाम स्मशानभूमी हा मूळ पनवेलकरांच्या भावनांशी निगडित विषय असून, गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरपासून स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनीही महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करत नादुरुस्त शवदाहिनीची तातडीने दुरुस्ती करावी आणि नवीन अत्याधुनिक शवदाहिनी बसवावी, अशी मागणी लावून धरली होती.
या प्रश्नाची गंभीर दखल घेत महापौर नितीन पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अमरधाम स्मशानभूमीची पाहणी केली होती. त्यानंतर जुन्या शवदाहिनीचा वापर बंद करून आधुनिक शवदाहिनी उभारण्याचा प्रस्ताव महासभेच्या चर्चेसाठी मांडण्यात आला. मात्र, विषयपत्रिकेच्या गोषवाऱ्यात शिवसेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा आणि संबंधित पत्रव्यवहाराचा उल्लेख नसल्याबद्दल शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदविला. हा श्रेयाचा विषय नसून अधिकृत अभिलेखात वस्तुस्थितीची नोंद असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महासभेत अमरधाम स्मशानभूमीचे स्थलांतर किंवा बंद करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही शिवसेनेने कठोर भूमिका घेतली. कोणतेही नैसर्गिक अथवा तांत्रिक कारण पुढे करून स्मशानभूमी हलविण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला. तसेच नागरिकांना सन्मानपूर्वक, अखंड आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अमरधाम स्मशानभूमीचे तातडीने आधुनिकीकरण करण्याची मागणीही महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली.