रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. ओळखीचे रूपांतर मैत्रीत करून त्यानंतर अनैतिक संबंध प्रस्थापित करत पीडित मुलीला गर्भवती केल्याचा आरोप संबंधित तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी २०२५ ते १७ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पीडित मुलगी तिच्या चुलत बहिणीकडे राहत होती. त्याच ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या आरोपीशी तिची ओळख झाली. सुरुवातीला साधी ओळख असलेले संबंध पुढे मैत्रीत परिवर्तित झाले. या मैत्रीचा गैरफायदा घेत आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत वारंवार अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. काही महिन्यांनंतर मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 24/2026 नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध POCSO Act अंतर्गत कलम ४ व ८ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम 64(2)(M) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सत्यभामा खरात करीत असून वैद्यकीय तपासणी, जबाब नोंदविणे आणि पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांनी अधिक जागरूक राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.