कोकण दौऱ्यादरम्यान घडलेल्या वाहनप्रकरणावरून सुरू झालेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम देत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत त्यांनी हा संपूर्ण विषय कुटुंबीय भावनेतून घडलेला असल्याचे सांगत राजकारण करू नये, असे स्पष्ट केले.
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले की, आदरणीय अजित पवार हे राष्ट्रवादी परिवाराचे कुटुंबप्रमुख होते. त्यांच्या पश्चात आदरणीय सुनेत्रा पवार पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आल्या होत्या. अशा प्रसंगी अनिकेतभाईंनी त्यांच्या वाहनाचे सारथ्य केले. संबंधित वाहन हे सरकारी नसून खासगी होते आणि याबाबत उपमुख्यमंत्री कार्यालयास पूर्वकल्पना देण्यात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“आम्ही काकींची लेकरंच आहोत,” असे भावनिक शब्दांत सांगत त्यांनी या कृतीमागील नातेसंबंध अधोरेखित केले. पार्थदादा, जयदादा यांच्याप्रमाणेच अनिकेतभाई आणि आम्हीही कुटुंबातील सदस्य आहोत. त्यामुळे कुटुंबीय म्हणून वाहन चालवण्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता, असे त्यांनी नमूद केले. या प्रकरणात काहींनी राजकारण शोधल्याची खंत व्यक्त करत, “ज्यांच्या मनातील वात्सल्याची भावना मेली आहे, ज्यांच्या डोक्यात सतत राजकारण आहे, त्यांनीच यात वाद निर्माण केला,” अशी टीकाही त्यांनी केली.
या स्पष्टीकरणानंतर संबंधित वादावर पडदा पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंत्री तटकरे यांच्या पोस्टमुळे हा विषय भावनिक आणि कुटुंबीय संदर्भातच पाहावा, असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.