रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. “अंगातून भूत काढतो” असा खोटा दावा करून एका तथाकथित मांत्रिकाने मुलीच्या कुटुंबाला फसवले आणि विश्वास संपादन करून 22 नोव्हेंबर 2025 रोजी मुलीवर बलात्कार केला. ही गंभीर घटना महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अदिती तटकरे यांच्या मतदारसंघातच घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीच्या आईला उपचारांच्या नावाखाली फसवून मुलगी व तिच्या आईला स्वतःच्या चारचाकी वाहनातून श्रीवर्धन येथे आणले. सायंकाळी सुमारे 7.30 वाजता शहरात पोहोचल्यावर त्याने मुलीच्या आईला ‘उपचारासाठी तयारी’ असे सांगून समुद्रकिनाऱ्यावर बसण्यास सांगितले. आईला जाणीवपूर्वक दूर ठेवल्यानंतर आरोपीने मुलीला एकटी करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. धक्क्यात गेलेली पीडित मुलगी घरी परतल्यानंतर निने कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला.
कुटुंबीयांनी तातडीने श्रीवर्धन पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरुद्ध कठोर गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाचे काम उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, ही घटना महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात घडल्याने स्थानिक पातळीवर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याची, तसेच अंधश्रद्धेविरोधी जनजागृती वाढवण्याची मागणी केली आहे.