स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषद निवडणुकीत मतदानादरम्यान मोठा गोंधळ आणि हिंसाचार उसळून तणाव वाढला. प्रभाग क्रमांक दोन व तीनमधील जुन्या स्टेट बँकेजवळील मतदान केंद्राबाहेर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासून सुरू झालेला वाद दुपारपर्यंत भांडण, हाणामारी आणि वाहनफोडीपर्यंत पोहोचला.
मतदानासाठी आलेल्या मतदारांपेक्षा बाहेरून आलेल्या मोठ्या गर्दीमुळे मतदानात अडथळे येत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली होती. गर्दी हटवण्याच्या मागणीकडे पोलीसांनी दुर्लक्ष केल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप नागरिकांनी केला. वाद आणि हाणामारी पोलिसांच्या उपस्थितीतच होत असूनही पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कालपासूनच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने महाडमध्ये उपस्थिती होती.
दरम्यान, नवीन नगर शाळा क्रमांक ५ मतदान केंद्राबाहेर शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना नेते विकास गोगावले यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत झांबरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोगावले यांनी केला. यावेळी आपल्या दिशेने रोखण्यात आलेले रिवाल्वर पोलिसांनी जप्त केल्याचे त्यांनी सांगितले.
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महाड शहराचा बंदोबस्त तातडीने वाढवून रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) तुकडी दाखल केली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुरक्षा कडक करण्यात आली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी नेत्या स्नेहल जगताप यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये पुन्हा हिंसाचार होऊ नये म्हणून शहरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.