विकासकामांची पाटी दाखवा, हजार रुपये मिळवा – राजपुरीत विकासाचा सवाल पेटला

अलिबाग | अमुलकुमार जैन
राजपुरी जिल्हा परिषद गटात विकासकामांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिंदे गटाचे उमेदवार विघ्नेश माळी यांनी माजी जिल्हा परिषद सदस्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “विकासकामांची एक तरी पाटी दाखवा आणि हजार रुपये मिळवा” असे थेट जाहीर आव्हान देत माळी यांनी मागील कार्यकाळातील कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
२०१७ साली या गटातून जिल्हा परिषदेत निवडून गेलेल्या उमेदवारांकडून परिसरातील जनतेने मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या. त्या काळात जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. सत्तेत असूनही या भागातील विकासासाठी ठोस कामे झाली नाहीत, असा आरोप विघ्नेश माळी यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राजपुरी गटातील तब्बल १२ ग्रामपंचायतींमध्ये आज एकाही विकासकामाची पाटी दिसून येत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. माळी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधल्याचा दावा करत सांगितले की, निवडून गेलेल्या प्रतिनिधींनी जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे तर दूरच, पण निधीच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरवण्यातही अपयश आले. रस्ते, पाणीपुरवठा, गटारे, समाजमंदिरे, अंगणवाड्या अशा विकासकामांचा मागमूसही या भागात दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला.
ज्या उमेदवार सत्तेत होत्या, त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचा निधी उपलब्ध होता. मात्र तो निधी नेमका कुठे खर्च झाला, याचा हिशेब जनतेला मिळालेला नाही. म्हणूनच आम्ही खुले आव्हान देत आहोत, त्यांच्या नावाची एक तरी विकासकामाची पाटी दाखवा, आम्ही हजार रुपये देऊ, असे विघ्नेश माळी म्हणाले. या वक्तव्यामुळे राजपुरी गटात राजकीय खळबळ उडाली असून माजी सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली आहे. विकासाच्या मुद्द्यावरून निवडणुकीच्या तोंडावर वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत. नागरिकांमध्येही या आरोपांबाबत चर्चा सुरू असून “खरंच विकास झाला असेल, तर तो दिसत का नाही?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, विघ्नेश माळी यांनी आपण निवडून आल्यास विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर पारदर्शकपणे मांडू, तसेच प्रत्येक कामाची माहिती पाटीच्या माध्यमातून ग्रामपातळीवर उपलब्ध करून देऊ, असा शब्द दिला आहे. राजपुरी गटात यंदाची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच लढवली जाणार, हे त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे स्पष्ट झाले आहे.