डबल बिल काढणाऱ्यांचे पार्सल गावी पाठवा – आ. प्रवीण दरेकरांचा घणाघात

#डबल बिल काढणाऱ्यांचे पार्सल गावी पाठवा
पोलादपूर | शैलेश पालकर 
कोटयवधींचा विकासनिधी आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामाध्यमातून मंजूर करून पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाठविला. विधीमंडळ अधिवेशनातही तालुक्याचे प्रश्न सातत्याने उपस्थित केले. जिल्हा परिषदेमध्ये लोहारे गटातील मतदारांनी ज्यांना निवडून दिले त्यांनी एकच काम दोन वेगवेगळया हेड7खाली केली आणि डबल बिले काढली अन् विकासकामे न करताही बिले काढली. आता ते पार्सल त्यांच्या गावी पाठवा, असा घणाघात कॅबिनेट दर्जाचे आ.प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे लोहारेतील उमेदवार चंद्रकांत कळंबे यांच्या नामोल्लेखासह केला.
पैठण आणि लोहारे येथे शनिवारी सायंकाळी आ.दरेकर यांच्या लोहारे गटाचे भाजपचे उमेदवार कृष्णा कदम, कोतवाल बुद्रुक गणाचे उमेदवार सुरेंद्र चव्हाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोहारे गणाच्या उमेदवार युगज्ञा उतेकर यांच्या प्रचारार्थ जाहिर सभांचे आयोजन करण्यात आले असता आ.दरेकर बोलत होते.
याप्रसंगी पुढे बोलताना आ.दरेकर यांनी, तीन वेळा निवडून येऊन जिल्हा परिषदेच्या तिजोरीची नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी सोहळयानिमित्त दरवर्षी लुट करणाऱ्यांनी उमरठच्या प्राथमिक शाळेची इमारतही सुस्थितीत ठेवली नसल्याने विद्यार्थ्यांना मंदिरात शिक्षण घ्यावे लागत असल्याची टीका करून चंद्रकांत कळंबे यांच्याशी संबधितांचे काळेधंदे नावानिशी उघड केल्यानंतर उपस्थितांनी जल्लोष केला.
पैठण येथे व्यासपिठावर मुंबईचे नगरसेवक प्रकाश दरेकर, भाजपचे नेते ऍड.आस्वाद पाटील, रिपाइंचे सुदास मोरे, नागेंद्र राठोड, भाजप तालुकाध्यक्ष वैभव चांदे, महिला जिल्हा उपाध्यक्ष तनुजा भागवत, माजी सभापती दिलीप भागवत, माजी राजिप सदस्य मुरलीधर दरेकर व अनिल नलावडे, प्रसन्ना पालांडे, संतोष मोरे,  विनोदराव मोरे तसेच उबाठा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रारंभी माजी राजिप सदस्य मुरलीधर दरेकर यांनी भाषणात, के.के. यांच्याविरोधातील उमेदवाराला एकवेळा सहन केला त्याचे स्वत:चे मत या विभागात नाही त्यांना परत पाठवायचे आहे. सर्वसाधारण आरक्षण पुन्हा त्यांच्या देवळे खोऱ्यात पडेल म्हणून ज्यांनी आमदारांच्या माध्यमातून तिकडेच कामे केली पण इथे एकदा निवडून देऊनही कोणतेही काम उमेदवाराने केले नाही. लोहारे गटातच सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे कामे न करणाऱ्याचे पार्सल परत पाठवा, कृष्णा कदम व सुरेंद्र चव्हाण यांना विजयी करा, असे आवाहन केले.
यावेळी प्रवेशकर्ते मनसे तालुकाध्यक्ष दर्पण दरेकर यांनी आ.प्रवीणभाऊ यांच्यावर विश्वास ठेऊन प्रवेश करीत असल्याने पुढील वाटचालीसाठी भाऊंचे आशीर्वाद महत्वाचे असल्याचे सांगितले. रिपाइंचे सुदास मोरे यांनी तथागत गौतम बुध्द आणि लक्ष्मीदेवीच्या हाती असलेल्या कमळासमोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. मुंबई मनपाचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी, कृष्णा कदम एलएलबी शिकले आहेत, त्यांच्यासारख्या उच्चशिक्षित आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या उमेदवाराला मते द्या असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपनेते ऍड.आस्वाद पाटील यांनी, तालुकाध्यक्ष वैभव चांदे व अन्य कार्यकर्त्यांची सुचविलेली नांवे बाजूला ठेऊन कृष्णा कदम आणि सुरेंद्र चव्हाण यांची उमेदवारी निश्चित केली आहे, यांची उमेदवारांनी जाणीव ठेवावी, असे सांगून जनतेने दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी लोहारे गटाचे भाजपचे उमेदवार कृष्णा कदम यांनी, प्रवीणभाऊंनी जातीपातीचे राजकारण कधी केले नाही. मुरलीधर दरेकरांना फायनल झालेली उमेदवारी प्रवीणभाऊंनी माझ्यासारख्याला दिली आणि मुरलीधर दरेकरांनीही माझी साथ दिली असल्याचे सांगून मागील वेळी तिसऱ्या उमेदवाराने मते घेतल्यामुळे निसटता पराभव झाला होता. मात्र, आता आमनेसामने लढत होणार असल्याने तो धोकाही नसल्याचे यावेळी ठामपणे सांगितले. यावेळी कोतवाल बुद्रुक गणाचे भाजप उमेदवार सुरेंद्र चव्हाण यांनी पोलादपूरकरांसाठी सेवा देताना आधारकार्ड तसेच पॅनकार्डचे मोफत वाटप केले आणि पासपोर्टसाईज फोटोदेखील सुमारे 60 हजार कॉपीज दिल्याचे तसेच सैन्यभरतीपूर्व प्रशिक्षणाद्वारे 13 हजारांहून सैनिक भारतीय सैन्यदलात भरती केले असल्याचे सांगून पोलादपूर तालुक्यासाठी अजूनही खुप काही करण्याची इच्छा असल्याने निवडणूक लढत असल्याची माहिती दिली.
याप्रसंगी पैठण ग्रामस्थांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे जाहिर केले. तुटवलीचे उद्योजक विनोदराव मोरे तसेच मनसेचे पदाधिकाऱ्यांनीदेखील यावेळी भाजपमध्ये जाहिर प्रवेश केला.