लाचखोर GST उपायुक्त दीपक क्षीरसागर एसीबीच्या जाळ्यात

रायगड | अमुलकुमार जैन
जीएसटी स्क्रुटिनी आणि जीएसटी क्रेडिटच्या नोटीसची चौकशी थांबवण्यासाठी तब्बल १५ लाख रुपयांची लाच मागून आठ लाख रुपयांवर तडजोड केल्याप्रकरणी राज्यकर उपायुक्त दीपक क्षीरसागर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. नवी मुंबई एसीबीच्या पथकाने मंगळवारी माझगाव येथील विक्रीकर विभागाच्या कार्यालयात धडक कारवाई करत क्षीरसागर यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे कर विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराशी संबंधित जीएसटी स्क्रुटिनी आणि जीएसटी क्रेडिट नोटीसची चौकशी थांबवण्यासाठी आरोपी दीपक क्षीरसागर यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला १५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर तक्रारदारासोबत तडजोड करत आठ लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
याप्रकरणी तक्रारदाराने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी सुरू असताना प्रकरणातील विविध बाबींची सखोल चौकशी करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासादरम्यान, दीपक क्षीरसागर हे यापूर्वी कोकण भवन, बेलापूर येथील विक्रीकर विभागात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत असताना या प्रकरणाशी संबंधित लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले. त्यानंतर मंगळवारी एसीबीच्या पथकाने माझगाव येथील विक्रीकर भवन कार्यालयात कारवाई केली.
या कारवाईनंतर क्षीरसागर यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्या पदाचा गैरवापर करून आर्थिक लाभाची मागणी केली जात असल्यास नागरिकांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. GST चौकशीसारख्या संवेदनशील प्रशासकीय प्रक्रियेत लाचेची मागणी झाल्याच्या या प्रकरणामुळे करदाते आणि व्यावसायिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.