रायगडच्या शिक्षणाचा ‘निकाल’ धक्कादायक!; चौथी-सातवीत पास पेक्षा नापास विद्यार्थ्यांची संख्या कित्येक पटीनं अधिक

रायगड | अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील शिष्य वृत्तीचा निकाल धक्कादायक वास्तव समोर आणणारा ठरला आहे. इयत्ता चौथी आणि सातवीच्या तालुकानिहाय शिष्यवृत्तीचा
निकालाची आकडेवारी पाहता उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा अपयशी विद्यार्थ्यांची संख्या कित्येक पटीने अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिष्यवृत्तीचा
चौथीच्या परीक्षेत तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत अपयशी विद्यार्थ्यांची संख्या तब्बल पाचपट आहे. त्यामुळे रायगडच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षण विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
११ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शिष्यवृत्तीचा तालुकानिहाय निकालाच्या आकडेवारीनुसार, इयत्ता चौथीसाठी जिल्ह्यात १४ हजार १८६ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी १३ हजार ५१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. यामध्ये केवळ २ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण, तर तब्बल १० हजार ८५८ विद्यार्थी अपयशी ठरले. म्हणजेच उपस्थित विद्यार्थ्यांपैकी केवळ १६.८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तब्बल ८३ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना यश मिळाले नाही.
शिष्य वृत्तीचा चौथीच्या निकालात पनवेल तालुक्याची विद्यार्थीसंख्या सर्वाधिक आहे. येथे ३ हजार ७३९ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी केवळ ८६१ विद्यार्थी उत्तीर्ण, तर २ हजार ७७८ विद्यार्थी अपयशी ठरले. अलिबागमध्ये ९५२ उपस्थित विद्यार्थ्यांपैकी १२०, महाडमध्ये ९१० पैकी १६४, माणगावमध्ये १ हजार २५ पैकी १३६ आणि रोहा तालुक्यात ८४७ पैकी १७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
शिष्य वृत्तीचा इयत्ता सातवीचा निकालही समाधानकारक नसल्याचे आकडेवारीतून दिसून येते. जिल्ह्यात सातवीसाठी ८ हजार ५७ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी ७ हजार ३३८ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. यामधून केवळ १ हजार ५५८ विद्यार्थी उत्तीर्ण, तर तब्बल ५ हजार ७८० विद्यार्थी अपयशी ठरले. सातवीचा उत्तीर्णतेचा टक्का २१.२३ टक्के इतकाच राहिला.
सातवीतही पनवेलमध्ये २ हजार २१ उपस्थित विद्यार्थ्यांपैकी ५९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर १ हजार ४३१ विद्यार्थी अपयशी ठरले. महाडमध्ये ६०७ पैकी १६०, माणगावमध्ये ५३३ पैकी ९७ आणि रोह्यात ५०४ पैकी १४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
निकालामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक क्षमतेबरोबरच अध्यापनाची गुणवत्ता, शाळांमधील शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अपयशी होण्यामागची कारणे शोधून तालुकानिहाय उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा प्राथमिक शिक्षणाच्या पायाभरणीवरच प्रश्नचिन्ह कायम राहण्याची शक्यता आहे.