पेण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांकडून नर्सला लाथा-छत्रीने मारहाण; गुन्हा दाखल

PEN न्यूज ऑनलाइन टीम |
पेण उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेची वेळेत वैद्यकीय तपासणी न केल्याचा आरोप स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कृष्णा सोनावणे यांच्यावर करण्यात आला आहे.
पेण पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, सोमवार दि.10 ऑगस्ट रोजी पहाटे दोनच्या सुमारास गौरी देवजी कडू प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या. ऑनड्युटी नर्सने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क न झाल्याने लेखी कॉल पाठविण्यात आला. त्यानंतरही डॉक्टर रुग्णालयात न आल्याचा आरोप असून, रुग्णाला अलिबाग येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र प्रसूतीकळा वाढल्याने गौरी कडू यांची रुग्णालयातच प्रसूती झाली.
प्रसूतीनंतर टाके घालण्याची जबाबदारी नर्सवर सोपविण्यास सांगितल्यावर डॉक्टरांनी ऑनड्युटी नर्सला शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. नर्सने या प्रकाराचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता, डॉक्टरांनी हातातील छत्रीने तिच्या हातावर मारहाण करून मोबाईल खाली पाडला तसेच लाथेने मारहाण केल्याचा आरोप आहे. पेण पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, डॉक्टरांनी “मुर्ख, बेअक्कल” अशा शब्दांत शिवीगाळ केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
या झालेल्या प्रकरणाने रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, डॉक्टर-कर्मचारी समन्वय आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पेण पोलिस करीत आहेत. 
.