लांजा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. यामुळे प्रभानवल्ली (गोसावीवाडी) येथे शुक्रवारी सकाळी २९ ऑगस्ट रोजी सुमारे ११ वाजता नदी पार करताना एक युवक पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार प्रभानवल्ली येथील खेगडे कुटुंब गणेशोत्सवानिमित्त गावी आले होते. त्यातील मिलिंद विजय खेगडे (वय २८) आणि केतन श्रीपत खेगडे (वय ३५) हे सकाळी साडेनऊ वाजता सिद्धेश्वर देवस्थानात दर्शनासाठी गेले होते. मात्र परतीच्या वाटेवर पावसामुळे आलेल्या पूराच्या प्रवाहात ते सापडले. मिलिंद खेगडे याने कशीबशी सुटका करून घेतली, पण दुर्दैवाने केतन खेगडे वाहून गेला.
या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिलिंद खेगडे याला या घटनेचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. स्थानिक प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली असून नागरिकांना नदी-नाल्याजवळ जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.