पेण पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या एका धक्कादायक प्रकरणात ओळखीच्या व्यक्तीकडून महिलेस शारीरिक व मानसिक छळ, धमक्या आणि बदनामीचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर आरोपीने लग्नास नकार देत गंभीर धमक्या दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, लग्नाची वेळ आल्यावर त्याने अचानक नकार दिला. फिर्यादीने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करणार असल्याची माहिती दिल्यानंतर आरोपीने “तुझे दुसरे कोणाशी लग्न मी होऊ देणार नाही” अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
आरोपीने फिर्यादी व स्वतःचे एकत्र फोटो अनोळखी मोबाईल क्रमांकावरून तिच्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी देत बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 275/2025 नोंदवण्यात आला असून, भारतीय दंड संहिता कलम 69, 351(2) व 356(2) अंतर्गत कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वेगुर्लेकर करत आहेत.
या घटनेमुळे स्त्रियांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा धमक्या व बदनामीचे प्रयत्न महिलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. पोलिसांनी तातडीने संरक्षणात्मक पावले उचलली असून आरोपीच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही कठोर कारवाईची मागणी करत समाजात जागरूकतेचे आवाहन केले आहे.