महाराष्ट्रातील प्रतिभावान मनुष्यबळ, सक्षम पायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण यामुळे राज्य ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) साठी अग्रगण्य ठरत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावर्षी जाहीर केलेले नवीन GCC धोरण उच्च मूल्याच्या, कौशल्याधारित रोजगारनिर्मितीस चालना देणार असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी स्थिर व सक्षम वातावरण देण्यास राज्य शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे 6 एकर जागेवर 20 लाख चौरस फूट भाडेतत्त्वावरील भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पांतर्गत बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे GCC स्थापन केले जाणार असून करार 20 वर्षांसाठी करण्यात आला आहे. 2029 पर्यंत पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पात 1 अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक अपेक्षित असून 30,000 हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. हा प्रकल्प MMRDA व ब्रुकफिल्ड यांच्या नेतृत्वाखाली भागीदार बी. एस. शर्मा यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी 100 टक्के हरित ऊर्जेचा वापर केला जाणार असून इमारत सर्वोत्तम शाश्वत बांधकाम मानकांनुसार उभारली जाणार आहे. यामुळे मुंबईचे GCC हब म्हणूनचे स्थान अधिक बळकट होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ब्रुकफिल्डचे वरिष्ठ गुंतवणूक अधिकारी अंकुर गुप्ता यांनी सांगितले की, मुंबईतील कंपनीची एकूण गुंतवणूक आता 4 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली असून उच्च दर्जाची, आधुनिक व शाश्वत कार्यस्थळे निर्माण करण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे.