मुंबई आणि रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई व रायगडसाठी Red Alert जाहीर केला असून, पुढील 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत तात्काळ निर्णय घेत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला असून, पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याला तुफान पावसाने झोडपले आहे. महाड तालुक्यातील किल्ले रायगड आणि करमर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुफान पाऊस बरसात असल्याने सांदोषी गावाला जाणाऱ्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली असून सांदोसी आणि बावळे गावाला जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे जवळपास या दोन गावांचा महाड तालुक्याचे संपर्क तुटला आहे.
काळ नदीला प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी आल्याने बिरवाडी मधील आसनपोई कुंभारवाडा मार्गे बिरवाडीत जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. काळ नदीच्या पाण्यामुळे महाड शहराला देखील याचा धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याच प्रमाणे रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यातील ढोरजे नदी पुलावरून सकाळी ८ वाजल्या पासून पाणी जात आहे . म्हसळा शहरातील बाजारपेठ मध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने नागरिकांची दैना उडाली. कोलाड- आंबेवाडी चौकात सुरू असलेल्या उडाण पूलामुळे चौकला नदीपात्राचे स्वरूप आल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे समजते.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग तालुक्यातील धोकवडे नं.२ येथे पूरस्थितीत ८०-९० नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाला विनवणी करून आमच्या गावातील सरपंच किंवा इतर राजकीय लक्ष द्यायला तयार नाही असे येथील काही नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील मुरुड राजपुरी दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर लगतच्या डोंगरातून भला मोठा दगड आल्याने काही काळ मोठ्या वाहनाची वाहतून बंद करण्यात आली होती.
रायगड जिल्हा प्रशासन मात्र या संदर्भात शांतच ..?
रेड अलर्ट असूनही, मुसळधार पावसाने कुंडलिका, आंबा, सावित्री या नद्यांनी थोक्याची पातळी ओलांडली आहे तर पाताळगंगा, उल्हास, गाढी नद्या दुथडी भरून वाहत असताना, डोंगर-नाले ओसंडून वाहत असताना, शाळा, कॉलेज, महाविद्यालय बंद करण्याचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
पालकांचा सवाल – “मुंबईला सुट्टी, रायगडला का नाही?”
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून मुंबईत प्रशासनाने संवेदनशील निर्णय घेतला. मात्र रायगड जिल्ह्यातील प्रशासनाने अजूनही कोणताही आदेश जारी केलेला नाही. यामुळे अनेक शाळा आणि महाविद्यालयांत विद्यार्थी पावसात प्रवास करत आहेत. मुसळधार पावसात वाहतूक ठप्प, नद्या-नाले तुडुंब, अशा परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय पालकांच्या पचनी पडलेला नाही.
Social Media वर संताप
#RaigadRain #SchoolHoliday #RedAlert अशा हॅशटॅगसह अनेक पालक सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. “मुंबईला सुट्टी मिळते, रायगडच्या विद्यार्थ्यांचे काय?” असा प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारला जात आहे.
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी बाहेर पडावे – असा सल्ला प्रशासन देत असताना, विद्यार्थ्यांना मात्र शाळा-कॉलेजला जाण्यास भाग पाडले जात आहे.
रायगड जिल्हा प्रशासनाने तातडीने मुंबईप्रमाणेच शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरताना दिसत आहे.