थंड हवेचे आणि निसर्ग संपदांनी नटलेले माथेरान हे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. विशेषतः श्रावण महिन्यात या डोंगरकपारींमध्ये औषधी गुणांनी युक्त रानभाज्या मोठ्या प्रमाणावर उगवतात. आदिवासी समाज या भाज्या गोळा करून विक्री करतो व त्यावर उदरनिर्वाह चालवतो. नागरिकांकडून यांना श्रावणात प्रचंड मागणी असते. या पार्श्वभूमीवर कोकण माथेरान कोकणवासी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत सुतार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेला ‘रानभाजी महोत्सव’ माथेरान कम्युनिटी सेंटर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन समाजातील ज्येष्ठ सदस्य भालचंद्र सावंत, कांचन केतकर, समाजाध्यक्षा सारिका पाटील, रिया दळवी व परेंडु मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या महोत्सवात रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. भाज्यांचे औषधी गुणधर्म, आरोग्यदायी फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच या भाज्यांपासून तयार केलेले स्वादिष्ट पदार्थ नागरिकांना चाखण्यासाठी ठेवण्यात आले होते.
याशिवाय बांबूपासून बनविलेल्या वस्तू, शिंपल्यांपासून तयार दागिने आणि रानभाज्यांवरील माहितीपूर्ण पुस्तके यांच्या छोट्या स्टॉल्सनी महोत्सवाला आणखी रंगत आणली.या उपक्रमाला शाळकरी विद्यार्थी, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असतानाही नागरिकांनी उपस्थित राहून महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद दिला.
यशस्वीतेसाठी समाजाच्या कार्यकारिणी सदस्यांसह महिला, पुरुष आणि तरुणांनी उत्साहाने योगदान दिले. पत्रकार दीपक बोराडे याचे विशेष सहकार्य लाभले ,उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार आयोजित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. “रानभाज्यांची माहिती आणि चव पुढील पिढीपर्यंत पोहोचावी हा महोत्सवाचा उद्देश निश्चित साध्य झाला आहे,” असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
पावसाच्या तुफानी सरींमध्येही नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे या महोत्सवाच्या यशाची खरी पावती आहे. माथेरानमध्ये घेतलेला हा आगळावेगळा उपक्रम आगामी काळातही परंपरा म्हणून जपला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.