मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ हद्दीतील बोरीफाटा पुलावर भरधाव पिकअप टेम्पोने वॅगनआर कारला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. शनिवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी वडखळ पोलिसांनी पिकअप टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवेगाव-डोलवी, ता. पेण येथील दिनेश देवजी म्हात्रे (वय ४१) हे आपल्या वॅगनआर कार क्रमांक एमएच ०५ सीपी २४६३ मधून मुंबईहून गोव्याच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी नवनाथ सुभाष जाधव (वय २३, रा. हनवतखेडा, ता. जि. हिंगोली) हा महिंद्रा पिकअप टेम्पो क्रमांक एमएच ०४ ईसी ३५३० घेऊन मागून येत होता. टेम्पो चालकाने अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने कारला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात दिनेश देवजी म्हात्रे, मिनल प्रसाद पाटील (वय ३९), स्वरूप प्रसाद पाटील (वय १०), प्रसाद अविनाश पाटील (वय ४२) आणि शाश्वत विजय म्हात्रे (वय १६), सर्व रा. मोठे शहापूर-अलिबाग, हे जखमी झाले.
या प्रकरणी पिकअप चालक नवनाथ जाधव याच्याविरुद्ध वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. महामार्गावर वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.