राज्यात ऑक्टोबर हिटचा प्रभाव वाढत असून, वाढत्या तापमानामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने उष्ण व दमट हवामानाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन ते तीन दिवस उकाडा कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असली, तरी तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातही उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून, प्रखर उन्हामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवू शकतो.
पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे समुद्राकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहावर परिणाम होत असल्याने मुंबईसह कोकणात उकाडा वाढला आहे. पुढील दोन ते तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, यंदा कमी पर्जन्यवृष्टी आणि परतीच्या पावसाबाबतची अनिश्चितता यामुळे ऑक्टोबरमध्येही उन्हाचा चटका कायम असल्याचे चित्र आहे. राज्यातील काही शहरांमध्ये तापमान सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी वाढल्याचे सांगितले जात आहे. अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उष्णतेचा कालावधी वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी वृक्षाच्छादन वाढवणे आणि पर्यावरणाचे संतुलन राखणे महत्त्वाचे असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.