मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात खालापूर पंचायत समितीचा महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात खालापूर पंचायत समितीचा महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक
खालापूर | अर्जुन कदम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावून खालापूर पंचायत समितीने रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गटविकास अधिकारी संदीप कराड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुमित्राताई पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उद्देश ग्रामपंचायतींचा सर्वांगीण, शाश्वत आणि गुणवत्तापूर्ण विकास साधणे हा आहे. पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन, डिजिटल सेवा, आर्थिक स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता, रोजगारनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी या बाबींवर या अभियानात भर दिला जातो. या अभियानात खालापूर पंचायत समितीने प्रभावी कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे, खालापूर तालुक्यातील ४५ पैकी ४५ ग्रामपंचायतींनी अभियानासाठी नामांकन केले होते. संपूर्ण कोकण विभागातून खालापूर तालुक्याने मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय ठरले आहे.
खालापूर तालुक्यातील चौक, वडवल, साजगाव, वडगाव, शिरवली, नारिंगी, तांबाटी, आसरे आणि वासांबे या नऊ ग्रामपंचायतींनी विभागीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली. यापैकी काही ग्रामपंचायतींची नामांकने राज्यस्तरावर जाण्याची शक्यता आहे. गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी शैलेश तांडेल, विनोद चांदोरकर, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वयाने काम केले. ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांशी सातत्याने संवाद साधत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.
ग्रामस्थांचा सहभाग, विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे खालापूर पंचायत समितीला हे यश मिळाले. या सन्मानामुळे खालापूर तालुक्याच्या ग्रामीण विकासाच्या कामगिरीला राज्यस्तरावर विशेष ओळख मिळाली आहे.