म्हसळा तालुक्यात लाचखोरीचा पर्दाफाश; ना हरकत दाखल्यासाठी लाच मागणारे महिला-पुरुष अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

रायगड | अमुलकुमार जैन

म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत खारगाव खुर्द येथे ‘ना हरकत दाखला’ देण्यासाठी लाच मागितल्याच्या प्रकरणात महिला व पुरुष अशा दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रायगड पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराच्या विरोधात एसीबीने पुन्हा एकदा कठोर कारवाई केली आहे.
या प्रकरणात बबन लक्ष्मण कांबळे (वय ४४), कृषी अधिकारी व अतिरिक्त कार्यभार प्रशासक आणि कोमल निवृत्ती रामनबैनवाड (वय २६), ग्रामपंचायत अधिकारी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात महिला अधिकारीही पुरुष अधिकाऱ्याच्या बरोबरीने लाच स्वीकारण्याच्या व्यवहारात सहभागी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे “भ्रष्टाचारात महिलांचीही आघाडी” असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर रंगू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नागरिकाला मौजे सकलप येथील सर्व्हे क्रमांक १५/२ या जागेवर घर बांधण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ‘ना हरकत दाखला’ आवश्यक होता. हा दाखला देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून पैशांची मागणी करण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. तक्रारीनुसार, प्रशासक बबन कांबळे यांनी ५ हजार रुपये तर ग्रामपंचायत अधिकारी कोमल रामनबैनवाड यांनी ३ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता, दोन्ही अधिकाऱ्यांनी तडजोडीअंती प्रत्येकी ४ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबी रायगड पथकाने नियोजनपूर्वक सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने ग्रामपंचायत कार्यालयात पैसे दिल्यानंतर रामनबैनवाड यांनी ४ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर प्रशासक बबन कांबळे यांनाही ताब्यात घेण्यात आले.
या घटनेनंतर ग्रामपंचायत कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींकडून प्राथमिक चौकशी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सरकारी कामांसाठी लाच मागण्याच्या घटना अधूनमधून समोर येत असतात. या कारवाईमुळे ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचारावर काही प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या गैरप्रकारांविरोधात पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.