मुंबई–गोवा महामार्गाचे उद्घाटन करणार नाही – नितीन गडकरींचे स्पष्ट विधान

मुंबई | विशेष प्रतिनिधी 
गेल्या तब्बल सोळा वर्षांपासून रखडलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग  (NH‑66) काम अखेर अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी त्याच्या प्रचंड विलंबामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. या महामार्गाचे आपण उद्घाटन करणार नाही, असे स्पष्ट सांगत त्यांनी विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई ते गोवा दरम्यानचा हा महामार्ग कोकणातील प्रमुख दळणवळणाचा मार्ग मानला जातो. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सव, शिमगा तसेच इतर सणासुदीच्या काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांना खराब रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या धोक्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या कामाबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होत होते. दरम्यान, या मार्गाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, “हा महामार्ग खूप जुना प्रकल्प आहे आणि त्याच्या कामाला प्रचंड विलंब झाला आहे. त्यामुळे या महामार्गाचे उद्घाटन करण्यास मला संकोच वाटतो. इतका उशीर झालेल्या प्रकल्पाचे उद्घाटन करणे योग्य वाटत नाही.”
याशिवाय पुढील महिन्यात आपण स्वतः मुंबईहून गोव्यापर्यंत या महामार्गावरून प्रवास करून कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पाहणीनंतर उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असताना समृद्धी महामार्ग सारखा मोठा प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यामुळे कोकणातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आता उर्वरित काम जलद गतीने पूर्ण होऊन हा महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होईल, अशी अपेक्षा कोकणवासीय व्यक्त करत आहेत.