मुरुड नगराध्यक्षपदाचा धक्का : शिंदे गटाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह, राष्ट्रवादीकडून मोठा उलटफेर

Sunul tatkare murud jallosh
अलिबाग | अमुलकुमार जैन
मुरुड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाला बसलेला पराभव हा केवळ एका पदापुरता मर्यादित नसून, तो सध्याच्या राजकीय धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे. नगरसेवकांची संख्या अधिक असतानाही नगराध्यक्षपद गमावावे लागणे, हा निकाल अनेक अर्थांनी बोलका मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवख्या उमेदवार आराधना दांडेकर यांनी शिंदे गटाच्या माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील यांचा तब्बल दोनशे पन्नासहून अधिक मतांनी पराभव करत मुरुडच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवून आणला.
या निकालामागील महत्त्वाचे कारण म्हणजे अती आत्मविश्वास. गेल्या काही वर्षांत आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ विकासकामेच निर्णायक ठरत नाहीत, हे मतदारांनी पुन्हा अधोरेखित केले. याशिवाय, अंतर्गत नाराजी हा शिंदे गटासाठी मोठा अडसर ठरला. त्याच उमेदवाराला पुन्हा संधी दिल्याने पक्षातील इतर इच्छुकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम मतदानावर झाल्याची चर्चा आहे.
महायुतीतील मतविभाजन हा आणखी एक निर्णायक घटक ठरला. मुरुडसह अलिबाग तालुक्यातही अपेक्षित समन्वय न झाल्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला. विशेष म्हणजे, केवळ चार नगरसेवक निवडून आलेल्या राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद जाणे ही बाब शिंदे गटासाठी अधिकच जिव्हारी लागणारी ठरली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुरुडमध्ये हा निकाल महायुतीसाठी इशारा घंटा मानला जात असून, आगामी निवडणुकांसाठी आत्मपरीक्षण आणि धोरणात्मक बदलांची गरज अधोरेखित करणारा ठरतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *