बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासाला प्रशासनाने सुरुवात केली आहे. प्रस्तावित विकास आराखड्यांतर्गत मंदिरात विविध तांत्रिक तसेच बांधकामाची कामे होणार असल्याने, भाविकांसाठी सुमारे तीन महिने मंदिर दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
या बैठकीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना सादर करण्यात येणार असून, त्यांच्या मंजुरीनंतर मंदिर बंद ठेवण्याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला जाईल. ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
भीमाशंकर विकासासाठी राज्य सरकारने एकूण २८८.१७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या आराखड्यांतर्गत दर्शन रांगेचे सुयोग्य नियोजन, पिण्याच्या पाण्याची व भाविकांच्या निवासाची सोय, पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता दुरुस्तीची कामे, तसेच रस्ते, पार्किंग आणि स्वच्छता व्यवस्थेवर विशेष भर देण्यात येणार आहे.
२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यादरम्यान भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन, त्याआधी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असताना पूजा-अर्चा किंवा पर्यायी दर्शन व्यवस्थेबाबत देवस्थान ट्रस्टकडून लवकरच स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. भाविकांनी या बदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.