शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व माजी आमदार जयंत पाटील यांनी अलिबाग शहराच्या विकासाबाबत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. अलिबाग शहरातील जनतेने नेहमीच शेकापला साथ दिली असून, शहरात आजवर जे विकासकाम झाले आहे. त्यामागे योग्य नियोजन आणि दीर्घकालीन दृष्टीकोन आहे, असे त्यांनी सांगितले. शहरातील विविध योजनांचे नियोजन, पाणीपुरवठ्याचे काम आणि जलनियोजन यामध्ये शेकापची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
अलिबाग शहरात सुमारे पंचवीस टक्के लोकसंख्या कोळी बांधवांची असून, विकसित झालेल्या प्रभागांप्रमाणेच सर्व भागांचा समान विकास व्हावा, हे आपले स्वप्न असल्याचे जयंत पाटील यांनी नमूद केले. नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित होते आणि ही जनतेचीच मागणी होती, याची आठवण त्यांनी करून दिली. स्वातंत्र्यकाळापासून नाईक कुटुंबीयांचे या शहरात प्रतिनिधित्व राहिले असून, त्यांच्या कार्यामुळे शहरात त्यांच्याविषयी वेगळे प्रेम आणि आदर असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्याच्या आमदारकीच्या कार्यपद्धतीवर टीका करताना जयंत पाटील म्हणाले की, कमिशनशिवाय कामे होत नसल्याच्या तक्रारी गंभीर आहेत. अलिबागच्या जनतेने नाना कुंटे, मधु ठाकूर यांसारखे आमदार पाहिले असून, आजच्या आमदारांकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. पूर्वी अलिबागचे आमदार विधिमंडळात प्रभावी काम करून सभागृह गाजवत असत, मात्र आज ती परिस्थिती राहिलेली नाही.
अलिबाग–रोहा रस्त्याची बिकट अवस्था हे अपयशाचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. २४० कोटी रुपयांची तरतूद होऊनही रस्ता अर्धवट आहे, हे दुर्दैवी आहे. सरकारी निधीचा योग्य वापर व्हावा, ही जनतेची अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीला मिळालेले यश हे जनतेने दिलेले उत्तर असून, आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.