रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साळाव तपासणी नाका परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनचालकांच्या सोयीसाठी उभारलेली मार्गदर्शक भिंत आज राजकीय आणि वाढदिवसाच्या बॅनरबाजीने पूर्णपणे झाकली गेल्याचे चित्र समोर आले आहे. मुरुड, रोहा आणि मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यांचे किलोमीटर व दिशादर्शक माहिती या भिंतीवर नमूद करण्यात आली होती. मात्र, सध्या ती माहिती नागरिकांना दिसणेच अशक्य झाले आहे.
विशेष म्हणजे, या मार्गदर्शक भिंतीवर विविध राजकीय पक्षांचे बॅनर, पदाधिकाऱ्यांचे वाढदिवसाचे फलक, शुभेच्छा संदेश आणि जाहिराती मोठ्या प्रमाणावर लावण्यात आल्याने मूळ दिशादर्शक फलक पूर्णपणे झाकला गेला आहे. परिणामी, बाहेरून येणारे पर्यटक, वाहनचालक आणि नव्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून, रस्ता शोधण्यासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या अशा सार्वजनिक मालमत्तेचा वापर बॅनरबाजीसाठी होत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण साळाव तपासणी नाक्यासमोर असल्याने येथून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. तरीही संबंधित विभागाकडून या अनधिकृत फलकांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत, सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत बॅनर तातडीने हटवावेत आणि मूळ दिशादर्शक माहिती पुन्हा स्पष्टपणे दिसेल, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या बॅनरबाजीमुळे केवळ सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण होत नसून, शासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी उभारलेल्या मार्गदर्शक फलकांचाही उद्देशच निष्फळ ठरत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आता संबंधित विभाग आणि स्थानिक प्रशासन या प्रकाराची दखल घेऊन मार्गदर्शक भिंत मूळ स्वरूपात आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.