ऑनलाइन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत टेलिग्रामवरील बनावट ट्रेडिंग ग्रुपच्या माध्यमातून तब्बल १९ लाख ९० हजार १२५ रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्रथम फिर्यादीला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर टेलिग्रामवरील @Mariam_VIP005 या ग्रुपमध्ये जोडून ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. पुढे @BharatBharat_FNFD0001 या टेलिग्राम खात्यामार्फत ट्रेडिंगसंदर्भातील सूचना देत वेळोवेळी रक्कम गुंतविण्यास सांगण्यात आले. काही दिवसांनी गुंतवणुकीवर नफा झाल्याचे भासवून तो नफा काढण्यासाठी आणखी रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली. अशा प्रकारे फिर्यादीचा विश्वास संपादन करून आरोपींनी एकूण १९,९०,१२५ रुपयांची फसवणूक केली.
या प्रकरणाचा तपास करताना पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजीत अभंग, पोलीस उपनिरीक्षक दुडे, पोलीस कॉन्स्टेबल काकडे आणि म्हात्रे यांच्या पथकाने सापळा रचला. या कारवाईत योगेंद्र लोकेंद्रसिंह बैस (वय २३, रा. शिवपुरी, मध्य प्रदेश) याला मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले. ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.