माणगांवात वाहतूक कोंडीला ‘पेव्हर ब्लॉक’चा ब्रेक

माणगांव | नरेश पाटील 
 माणगांव शहर हद्दीतील जुन्या मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६लगत साईडपट्टी भराव व पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण झाल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रस्त्याची अतिरिक्त रुंदी उपलब्ध झाल्याने वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होत असून, आगामी गणेशोत्सवातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर हे काम महत्त्वाचे ठरणार आहे.
यापूर्वी साईडपट्टीचा योग्य भराव नसल्याने रस्त्याची वापरण्यायोग्य रुंदी कमी झाली होती. त्यामुळे गर्दीच्या काळात एकाच मार्गिकेत दोन्ही दिशेने वाहतूक सुरू असल्याने मोठी कोंडी होत असे. वाहनांच्या तीन-तीन रांगा लागून सहा किलोमीटरपेक्षा अधिक अंतरापर्यंत वाहतूक ठप्प होत असे आणि वाहनचालकांना ४५ मिनिटांपासून त्याहून अधिक काळ खोळंबून राहावे लागत होते.
आता साईडपट्टीवर भराव करून पेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्याने वाहतुकीस अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे. खड्डे, चिखल व पाणी साचण्याची समस्याही कमी झाली असून पादचाऱ्यांना सुरक्षित जागा मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून झालेले हे काम गणेशोत्सवातील संभाव्य वाहतूक वर्दळीच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार असून, माणगावातील दीर्घकाळाची वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे.