हरवलेले १८ मोबाईल शोधून खालापूर पोलिसांनी केले मूळ मालकांच्या स्वाधीन

चौक | अर्जुन कदम
 खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले तसेच चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. CEIR प्रणालीच्या माध्यमातून तब्बल ३ लाख ४ हजार २९९ रुपये किमतीचे १८ मोबाईल हॅन्डसेट शोधून काढत पोलिसांनी ते त्यांच्या मूळ मालकांना परत केले. पोलिसांच्या या कामगिरीचे मोबाईलधारकांकडून कौतुक होत आहे.

खालापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात स्थानिक तसेच बाहेरील नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या. गहाळ मोबाईलचा तत्परतेने शोध घेण्यासाठी पोलिसांनी CEIR प्रणालीचा प्रभावी वापर केला. या माध्यमातून गहाळ झालेले मोबाईल रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांत तसेच इतर राज्यांमध्ये असल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार तपास करून एकूण १८ मोबाईल हॅन्डसेट हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहल आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांच्या उपस्थितीत CEIR प्रणालीच्या माध्यमातून हस्तगत करण्यात आलेले सर्व १८ मोबाईल हॅन्डसेट सुस्थितीत त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत खालापूर पोलिसांचे आभार मानले. पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली असून, पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.