महाड -म्हाप्रळ रस्त्याचं काम पाच वर्षे रखडलं; मतांचा जोगवा मागणारे राजकीय नेत्यांची भूमिका गुलदस्त्यात?

Mhapral road
महाड (मिलिंद माने) : 
महाड तालुक्यातील महाड ते म्हाप्रळ या मार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम मागील पाच वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. रस्त्याच्या ठिकठिकाणी खोदकाम झाल्यामुळे आणि जुन्या मार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून कामचुकार ठेकेदारांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंचवार्षिक योजना जाहीर करून देखील रस्ता कधी पूर्ण होणार यावर अजूनही अनिश्‍चितता आहे.
पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला म्हाप्रळ-पंढरपूर मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. या मार्गातील ८२ किमीचा भाग महाड तालुक्यातून जातो. २०१८ साली या कामाची २८०.४२ कोटींची निविदा काढून एम. बी. पाटील कंपनीला काम देण्यात आले. मात्र, काम रखडल्यामुळे २०२१ मध्ये दुसरी निविदा काढून २०८.१० कोटींच्या कंत्राटासह अक्षय कन्स्ट्रक्शन व पीडीआयपीएल कंपन्यांना काम देण्यात आले.
त्यावेळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असली तरी, तीन वर्षांनंतरही काम अद्याप पूर्ण झालेले नाही. शिरगाव ते तुडील या ९ किमी अंतरातील संपूर्ण रस्ता खोदून ठेवलेला आहे. अनेक भागांत फक्त खडी पसरवण्यात आली असून, काही ठिकाणी एकेरी काँक्रीट केले गेले आहे.
विशेष म्हणजे, महाड औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी या मार्गावरून जाते. तिच्या स्थलांतरासाठी लागणाऱ्या सुमारे १५० कोटी रुपयांचा खर्च टाळण्यासाठी, सुमारे २० किमी अंतरामध्ये डांबरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात हे अंतर २० किमीपेक्षाही कमी असून, उर्वरित काम रखडलेलेच आहे.
महाड शिरगाव ते म्हाप्रळ या फक्त २४ किमी अंतरासाठी पाच वर्षे लागणे हे प्रशासन व ठेकेदारांच्या ढिसाळ कारभाराचे दर्शन घडवते. स्थानिक लोकप्रतिनिधींची यंत्रसामग्री ठेकेदाराकडे भाड्याने दिली गेल्यामुळे, त्यांचे ठेकेदारांशी संबंध असल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे जनतेच्या हितापेक्षा ठेकेदारांचे हित जपले जात असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
महाड, मुंबई-गोवा महामार्ग आणि रायगड मार्ग यांसारखे रस्ते देखील याच प्रकारे रखडले असून, अभियंते आणि ठेकेदार यांच्यावर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मतांचा जोगवा मागणारे नेते हे कामाविषयी मूक गिळून गप्प बसल्यामुळे, स्थानिक जनता हतबल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *