कर्जत रेल्वे स्थानकात बालतस्करीचा प्रयत्न उधळला; २९ लहान मुले ताब्यात, मदरसा शिक्षक चौकशीखाली

Karjat railway tation child matter
कर्जत (गणेश पवार) :
देशात मोठ्या प्रमाणात लहान मुलांची अवैध पद्धतीने तस्करी सुरू असल्याचे प्रकार समोर येत असताना, काही जागृत नागरिकांच्या सतर्कतेमुळे असे प्रकार वेळेवर उघडकीस येत आहेत. असाच एक प्रकार शुक्रवार, दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कर्जत रेल्वे स्थानकात उघड झाला.
एलटीटी-चेन्नई एक्सप्रेसच्या कर्जतकडील पहिल्या जनरल डब्यातून एक इसम २९ लहान मुलांना संशयास्पद पद्धतीने घेऊन प्रवास करत असल्याची माहिती रेल्वे पोलीस (जीआरपी) यांना जागृत नागरिकांकडून मिळाली. ही एक्सप्रेस गाडी रात्री ८.३० वाजता कर्जत स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आल्यानंतर, जीआरपीचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ गाडीत दाखल झाले.
तपासाअंती त्या इसमाचे नाव मो. जलालउद्दीन मो. फिदा हुसेन सिदीकी (वय २८), व्यवसायाने मदरसा शिक्षक, राहणार वायगरा, वॉर्ड नं. २, पो. जोकीहाट बॉल्क, ता. सिरसिया, जि. अररिया, बिहार असे निष्पन्न झाले. त्याने सांगितले की, संबंधित मुले ही त्याच्या गावातील नातेवाईकांची असून, त्यांना रायचूर (कर्नाटक) येथील मदरशामध्ये कुराण शरीफ व उर्दूचे शिक्षण देण्यासाठी घेऊन जात आहे.
कर्जत रेल्वे पोलिसांनी संबंधित मुलांच्या नातेवाईकांशी त्यांच्या दिलेल्या संपर्क क्रमांकांवरून चौकशी केली आणि माहितीची खात्री केली. तरीही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व २९ लहान मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आणि सध्या त्यांना कर्जत येथील बालगृहात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, लोहमार्ग मध्य परिमंडळाचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे व पोलीस निरीक्षक मुकेश ढगे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *