मनसेच्या दणक्यानं न्हावा शेवा फ्रीपोर्ट टर्मिनलची भरती जाहिरात रद्द – मराठी तरुणांना देणार प्राधान्य

Jnpt baithak avinash jadhav
उरण (विठ्ठल ममताबादे) : 
उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्टमधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनल (NSFT) जे एम बक्षी आणि सी एम ए टर्मिनल्स या कंपन्यांनी इंग्रजी वृत्तपत्रांमधून नोकर भरती जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामुळे स्थानिक मराठी तरुणांवर अन्याय होणार होता. या भरती संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अँड. सत्यवान भगत यांनी आंदोलनाचा इशारा दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संज्ञानात ही बाब आल्यानंतर प्रसारमाध्यमांतून या अन्यायाचा विषय उचलण्यात आला.
या पार्श्वभूमीवर जेएनपीटी बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिनांक २७ रोजी मनसे शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन इंग्रजी माध्यमात प्रसिद्ध झालेली जाहिरात तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. यापुढील सर्व नोकर भरती प्रक्रिया स्थानिक मराठी वृत्तपत्रांमधून जाहीर केली जाईल आणि स्थानिक भूमिपुत्र व मराठी तरुणांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हे आश्वासन मिळाल्यानंतर मनसे शिष्टमंडळाने चेअरमन वाघ यांचे आभार मानले.
या बैठकीस मनसेचे नेते अविनाश जाधव, संजय नाईक, संदीप दळवी तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे मराठी तरुणांना बंदर क्षेत्रात न्याय मिळणार असून, स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी खुले होणार आहेत. उपस्थित जनतेने मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत त्यांच्या संघर्षाला दाद दिली. “हा विजय हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिपुत्रासाठी लढ्याचा विजय आहे,” असे अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *