जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावाच्या हद्दीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याची घटना समोर आली आहे. एप्रिलअखेर PEN न्यूजने या धोक्याबाबत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर आता स्थानिक ग्रामस्थांनी वाढत्या भेगांमुळे चिंता व्यक्त केली आहे. या भागात पावसाळ्यात दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, तहसिलदार कपिल घोरपडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.
या पाहणीवेळी पळचिल ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उमेश मोरे, रवींद्र जाधव, प्रवीण मोरे आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कशेडी घाटात भुयारी मार्गाने नव्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले असले तरी भोगाव गावाजवळील जुन्या रस्त्यावर 5 ते 10 मीटर अंतरावर मोठ्या भेगा पडल्याचे दिसून आले आहे. या भागात पूर्वी डोंगर उत्खनन करून रस्ता तयार करण्यात आला होता, त्यामुळे पावसाळ्यात या भागात दरड कोसळण्याचा धोका आहे.
सद्यस्थितीत कशेडी घाटातून वाहतूक भुयारी मार्गे सुरू असली तरी भविष्यात भुयारी मार्ग बंद झाल्यास पर्यायी मार्ग म्हणून पुन्हा जुन्या मार्गाचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या महामार्गाची देखभाल आणि डागडुजी ही अतिशय महत्त्वाची बाब ठरते. तहसिलदार घोरपडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांना या भेगांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. भोगाव परिसरातील हे डेंजर झोन गेल्या काही वर्षांपासून वारंवार खचत असल्याने या भागात कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक आहे.