सुधागड तालुक्यातील निसर्गरम्य कळंब गावात फार्महाऊस आणि सेकंड होममध्ये येणाऱ्या बेशिस्त पर्यटकांच्या वागणुकीमुळे ग्रामस्थांचे जगणे मुश्कील झाले आहे. मुंबई, पुणे, ठाणे येथून शनिवार-रविवारी येणारे पर्यटक मद्यधुंद अवस्थेत अर्धनग्न फिरतात, मोठ्या आवाजात संगीत लावतात आणि धांगडधिंगा करतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात पाली पोलिस ठाण्यात ग्रामस्थांनी निवेदन देत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या फार्महाऊस परिसरात मद्यपान करून बाटल्या फेकणे, ओला-सुका कचरा नदीपात्रात टाकणे, पर्यावरणाची हानी करणे असे प्रकार वाढले आहेत. अनेक फार्महाऊस अकृषिक परवानगीशिवाय उभारलेले असून काहींनी घेतलेल्या परवानगीच्या अटींचा — जसे की वीज, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन — भंग केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, “आम्ही झाडं लावतो, किल्ले संवर्धन करतो, पण हे पैसेवाल्यांचे टोळके गावाची शांतता बिघडवत आहेत; हे आता सहन करणार नाही!” पाली पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी तक्रारीची दखल घेत चौकशीचे आश्वासन दिले आहे. तसेच अकृषिक परवानगीच्या अटींच्या भंगाबाबत ग्रामस्थांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र पाठवले असून, प्रशासन आता कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.