कर्जत (गणेश पवार) :
नेरळ शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना अखेर गती मिळाली असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते तब्बल १३७ कोटी रुपयांच्या रस्ते कामांचे भूमिपूजन शनिवारी साई मंदिर परिसरात पार पडले. या कामांमुळे नेरळ शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
या वेळी आमदार थोरवे म्हणाले, “कर्जतचा शाश्वत विकास हाच आमचा ध्यास आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून स्थानिकांना रोजगार आणि पर्यटनाचा विकास साधणे हे आमचे उद्दिष्ट आहे.” त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका करत, “ज्यांना काही काम राहिले नाही ते फक्त टीका करतात; आम्ही मात्र जनतेच्या विकासासाठी काम करतो,” असे सांगितले. माजी पंचायत समिती सभापती अमर मिसाळ यांनी भावनिक भाषणात “माझ्या शहरातील रस्त्याचे काम सुरू झाले, हेच माझे यश आहे,” असे सांगत उपस्थितांचे मन जिंकले.
नेरळ–कळंब राज्य मार्ग, आंबिवली–दामत–पेशवाई रस्ता आणि नेरळ–सुगवे रस्ता या तिन्ही मार्गांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना त्रास होत होता. आमदार थोरवे यांनी एमएसआरडीसीच्या हँग विभागातून १३७ कोटींचा निधी मंजूर करून घेतल्याने या रस्त्यांची पुनर्बांधणी होणार आहे. तसेच, नेरळ रेल्वे गेट येथे उड्डाणपूल, बसस्थानकावर ई-टॉयलेट सुविधा आणि आंबिवली रस्त्याची रुंदी वाढवणे अशा कामांनाही गती देण्यात येणार आहे. नागरिकांनी आमदार थोरवे आणि अमर मिसाळ यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, “आता नेरळ खड्डेमुक्त होऊन वाहतूक सुरळीत होईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
