आता ‘जंजिरा’ मोबाईलवर !

Murud janjira fort
अलिबाग (अमुकुमार जैन) :
राजपुरीहून शिडाच्या बोटीतून समुद्राच्या लाटांवरून जंजिरा किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी आता एक नवा अनुभव उपलब्ध झाला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI), मुंबई मंडळाने QR कोड आधारित ‘ई-वॉक ऑडिओ गाईड टूर’ सेवा सुरू केली आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या QR कोडला मोबाईलने स्कॅन करताच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ५ मिनिटांची माहितीपूर्ण ऑडिओ गाईड ऐकता येणार आहे. या गाईडमध्ये किल्ल्याचा इतिहास, त्याची बांधणी, संरक्षण यंत्रणा, तोफा आणि मराठा-मोघल संघर्षाचा आढावा दिला आहे.
मोबाईल स्कॅन करा, इतिहास ऐका!
भारतीय पुरातत्व विभागाचे सहाय्यक संवर्धक अधिकारी बजरंग येलीकर यांनी सांगितले की, “ही सेवा केवळ माहिती देणारी नाही, तर पर्यटनाचा अनुभव अधिक समृद्ध करणारी आहे.” परदेशी तसेच इतर राज्यांतील पर्यटकांसाठीही ही सेवा उपयोगी ठरणार असून, भाषेचा अडथळा दूर झाला आहे. QR कोड एकदा स्कॅन केल्यानंतर इंटरनेटशिवायही पर्यटक कुठेही, केव्हाही हा ऑडिओ गाईड ऐकू शकतात.
 इतिहास आता कानांमध्ये — जंजिरा किल्ल्याची ‘ई-वॉक टूर’ आकर्षण ठरणार!
दरवर्षी हजारो पर्यटक बोटीद्वारे किल्ला पाहायला येतात, पण बोटचालकांची माहिती मर्यादित असते. आता QR कोडच्या माध्यमातून पर्यटकांना संपूर्ण ऐतिहासिक माहिती सहज उपलब्ध झाली आहे. या नव्या उपक्रमामुळे जंजिरा किल्ला फक्त डोळ्यांनी नव्हे, तर कानांनीही ‘अनुभवता’ येणार आहे. हा उपक्रम इतर ऐतिहासिक स्थळांसाठी आदर्श ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *