जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात ?

जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात ?
उरण (विठ्ठल ममताबादे) : 
जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत जिल्हा तज्ञ, बीआरसी कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने यंदाची दिवाळी त्यांच्या अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निधीअभावी ही गंभीर परिस्थिती उद्भवली असून, कर्मचाऱ्यांनी शासनाकडे तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
राज्यभरातील हे कर्मचारी जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी सातत्याने करीत आहेत. मात्र, जुलै २०२५ पासून त्यांना मानधन मिळालेले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. “केंद्राकडून निधी न आल्यामुळे मानधन देणे शक्य नाही,” अशी उडवाउडवीची उत्तरे राज्य पाणीपुरवठा विभागाकडून मिळत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तसेच प्रधान सचिव (पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) यांना निवेदन देऊन मानधन तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे. “मानधन न मिळाल्यास दिवाळी सण आमच्यासाठी अंधारमय ठरेल,” अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शासनाने संवेदनशीलतेने हस्तक्षेप करून निधी तातडीने उपलब्ध करावा, अशी त्यांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *