पोलादपूर पंचायत समितीच्या गणांची उद्या आरक्षण सोडत

Aarakshan
पोलादपूर (शैलेश पालकर) :
पोलादपूर तालुका पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी प्रशासनाच्या पातळीवर पूर्ण वेगाने सुरू झाली आहे. पंचायत समितीच्या चार गणांचे आरक्षण सोडतीद्वारे काढण्यासाठी सोमवार, दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता शहरातील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे यांनी दिली आहे. पोलादपूर पंचायत समितीच्या मागील निवडणुकीत सदस्यांचे आरक्षण आधी जाहिर होऊन नंतर सभापती पदाचे आरक्षण जाहिर झाले होते. त्यावेळी निवडून आलेल्या चारही पंचायत समिती सदस्यांच्या प्रवर्गापेक्षा सभापती पदासाठी भिन्न आरक्षण जाहिर झाल्याने पुन्हा आरक्षण जाहिर करण्याची नौबत प्रशासनावर ओढवली होती.
पोलादपूर पंचायत समितीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीवेळी गोवेले 115 पं.स.गणातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शेकापक्षाच्या नंदा दिनकर चांदे, देवळे 116 पं.स.गणातून सर्वसाधारण प्रवर्गातून काँग्रेसचे शैलेश सलागरे, लोहारे 117 पं.स.गणातून नागरिकांचा मागास प्रवर्गातून शिवसेनेचे यशवंत कासार तर कोंढवी 118 पं.स.गणातून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून काँग्रेसच्या दिपिका दरेकर या निवडून आल्या. या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेकापक्षाची निवडणुकपुर्व आघाडी होती. परिणामी, या आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. मात्र, त्यावेळी पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीनंतर सभापतीपदाचे आरक्षण अनुसुचित जाती महिला पडल्याने काही काळ काँग्रेसचे शैलेश सलागरे हे सदस्य प्रभारी सभापतीपदी विराजमान झाले. हे अनुसुचित जाती प्रवर्गाचे आरक्षण निवडणुकीपुर्वी जाहिर झाले नसल्याने उमेदवारांअभावी यानंतर हे आरक्षण बदलण्यात येऊन सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सभापतीपदाचे आरक्षण जाहिर झाले. यामुळे सभापतीपदी काँग्रेसच्या दिपिका दरेकर यांना संधी मिळाली आणि प्रभारी सभापती शैलेश सलागरे यांना उपसभापती पदाची संधी मिळाली.
यानंतर कोराना लॉकडाऊन काळामध्ये पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य व पंचायत समिती सदस्यांसह नगरपंचायत सदस्यांचाही कालावधी वाढविण्याची मागणी होत असताना पोलादपूर नगरपंचायतीची निवडणुक नागरिकांचा मागास प्रवर्गाऐवजी सर्वसाधारण असा आरक्षण बदल होऊन दोन टप्प्यात घेण्यात आली. मात्र, नागरिकांच्या मागासप्रवर्गाचे भिजत घोंगडे न्यायप्रविष्ट राहिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या. यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य व पोलादपूर तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांना आपोआपच मुदतवाढ मिळाली.
पोलादपूर पंचायत समितीच्या 115 गोवेले, 116 देवळे, 117 लोहारे, 118 कोंढवी या चार गणांसाठी अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसह नागरिकांचा मागासप्रवर्ग व महिला संवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून रायगड जिल्हा परिषदेच्या लोहारे आणि देवळे गटासाठी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.
यंदा रायगड जिल्हा परिषद सदस्य तसेच पोलादपूर पंचायत समिती सदस्यपदाच्या निवडणुकीपूर्वी सभापती पदाच्या तसेच रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणांची घोषणा झाल्याने मागीलवेळीसारखा घोळ होणार नाही, हे निश्चित असून सोमवारच्या पोलादपूर येथील पंचायत समितीच्या गणांच्या आणि अलिबाग येथील गटांच्या आरक्षण सोडतीनंतरच पोलादपूर तालुक्यातील राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी वेगवान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *