भोगावती नदीवरील ब्रिटिशकालीन भुंडा पुलावरील वाहतूक बंद होऊ नये म्हणून कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला पर्यायी पूलच आजच्या जोरदार पर्जन्यवृष्टीत पाण्याखाली गेल्याने पेणकरांचा संताप अनावर झाला आहे. प्रशासनाच्या नियोजनाचा आणि संबंधित अभियंत्यांच्या कामाचा अक्षरशः फज्जा उडाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
पेण शहराला जोडणारा भोगावती नदीवरील ब्रिटिशकालीन भुंडा पूल हा अनेक वर्षांपासून वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा मानला जातो. मात्र पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदीचे पाणी पुलावरून वाहत जाऊन शहराचा संपर्क काही काळासाठी तुटत असे. ही समस्या कायमची दूर व्हावी, नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावा आणि वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये या उद्देशाने प्रशासनाने नव्या पुलाचे बांधकाम केले होते.
मात्र आज झालेल्या मुसळधार पावसाने प्रशासनाच्या सर्व दाव्यांची अक्षरशः पोलखोल केली आहे. मोठ्या गाजावाजात उभारण्यात आलेला हा पूल काही तासांच्या पावसातच पाण्याखाली गेला. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
संतप्त पेणकरांनी या घटनेवर उपरोधिक प्रतिक्रिया देताना म्हटले की, “ज्या अभियंत्यांनी हा पूल डिझाईन केला आहे त्यांचा नागरिकांनी मोठ्या जल्लोषात जंगी सत्कार करायला हवा.” नागरिकांचा हा संताप आता सोशल मीडियावरही उमटू लागला आहे.
साधारण 5 कोटी रुपये खर्चून उभारलेला पूल जर नागरिकांच्या उपयोगाचाच ठरत नसेल तर या कामाची तांत्रिक आराखडा आणि प्रशासनाचे नियोजन यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पुलाच्या बांधकामात सहभागी असलेल्या संबंधित अधिकारी, अभियंते यांच्यावर कारवाई होणार का? कामातील त्रुटींसाठी जबाबदारी निश्चित केली जाणार का? तसेच सार्वजनिक निधीच्या वापराबाबत त्यांच्याकडून वसुली केली जाणार का? असे संतप्त प्रश्न पेणकरांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
आजच्या परिस्थितीत पर्यायी पूलही नागरिकांसाठी निरुपयोगी ठरल्याचे चित्र दिसत असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.