PEN : बाळगंगा नदीच्या पुरानं खरोशी-दूरशेत जलमय; अनेक घरांत पाणी, नागरिकांचं मोठं नुकसान

बाळगंगा नदीच्या पुरानं खरोशी जलमय
PEN न्यूज ऑनलाइन टीम | 
पेण तालुक्यातील खरोशी-दूरशेत गावात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून सलग दुसऱ्या वर्षी गावाला महापुराचा फटका बसला आहे.
सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे खरोशी-दूरशेत परिसरातून वाहणाऱ्या बाळगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. नदीने धोक्याची पातळी ओलांडताच पुराचे पाणी गावात घुसले आणि अनेक घरांमध्ये शिरले. घरांमधील जीवनावश्यक वस्तूंसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची वेळ आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी पुराचा फटका बसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, पावसामुळे खरोशी गावात आणखी दोन दुर्घटना घडल्या. एका घरावर दरड कोसळल्याने भिंतीला तडा जाऊन मोठे नुकसान झाले, तर दुसऱ्या घरावर मोठे झाड कोसळल्याने त्या घराचेही नुकसान झाले. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच गावाकडे जाणारे दोन्ही प्रमुख रस्ते पाण्याखाली गेल्याने खरोशी-दूरशेत गावांचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे.
पूरपरिस्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतीच्या सरपंच रूपाली महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील ज्येष्ठ मंडळी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत पुरग्रस्त घरांतील आबालवृद्धांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आवश्यक मदत व उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरपंच रूपाली महेश पाटील यांनी दिली.