नव्या श्रीराम पुलाचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण; कर्जतकरांसह पर्यटकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका!

कर्जत | गणेश पवार
कर्जत शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या श्रीराम पुलाचे लोकार्पण राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे, कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, कार्यकारी अभियंता चव्हाण, उपअभियंता देवांग तसेच शिवसेना (शिंदे गट), भाजप, आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रिटिशकालीन जुना श्रीराम पूल अरुंद असल्यामुळे कर्जत शहरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती. विशेषतः शनिवार-रविवार आणि पर्यटन हंगामात पर्यटकांची वाढलेली गर्दी तसेच स्थानिक वाहनांची वर्दळ यामुळे वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.
या पार्श्वभूमीवर नव्याने बांधण्यात आलेला श्रीराम पूल आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, त्यामुळे कर्जत शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही याचा मोठा लाभ मिळणार असून, वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या भाषणातून बोलताना मित्रपक्षांतील समन्वयावर भाष्य करत, आमच्या मित्रपक्षाला जवळ घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. आम्ही ज्याची वाट पाहत होतो, त्या दिशेने आता सकारात्मक घडामोडी होत आहेत. ज्या पदाची अनेकजण प्रतीक्षा करत आहेत, त्याबाबतचा निर्णय येत्या आठ ते दहा दिवसांत जाहीर होईल. आमदार महेंद्र थोरवे यांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवा, घाई करू नका. पुढील काळात आणखी मोठे यश मिळवायचे असेल, तर खासदार श्रीरंग (अप्पा) बारणे आणि आमच्या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार एकजुटीने काम करावे लागेल,” असे आवाहन करत मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या भाषणात नव्या श्रीराम पुलामुळे कर्जत शहराच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. राज्य शासन विकासकामांना प्राधान्य देत असून, नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळातही कर्जत- खालापूर मतदारसंघात विकासकामांचा वेग कायम ठेवला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.