पोलिसांचा धक्कादायक उलगडा: ४ वर्षीय मुलीचा काका व मावशीने केला खून, मृतदेहाचे अवशेष चिंचवलीत सापडले

Child hatyara neral
कर्जत (गणेश पवार) : 
कल्याण कोळसेवाडी पोलिसांच्या तपासात नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील ४ वर्षीय मुलीचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या खुनात पीडितेचा सख्खा काका व मावशीच सामील असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून, मृत मुलीचे अवशेष मौजे चिंचवली, कर्जत येथे पोलिसांनी जप्त केले आहेत.
घटनेचा तपशील
कल्याण कोळसेवाडी हद्दीतील एक महिला दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह करून राहत होती. तिचा पती कारागृहात असल्याने तिच्या दोन मुली मामाकडे राहत होत्या. ऑगस्ट २०२४ मध्ये यातील ४ वर्षीय मुलगी कर्जत तालुक्यातील मौजे चिंचवली येथे राहणाऱ्या तिच्या मावशी अपर्णा प्रथमेश उर्फ आमर कांबरी हिच्या घरी आली होती. नातेवाईक वेळोवेळी मुलीची चौकशी फोनवर करत असत. परंतु दोन महिन्यांनंतर चौकशी केल्यावर काकाचे उत्तर टाळाटाळ करणारे होते. संशय वाढल्याने नातेवाईक चिंचवली येथे गेले असता घर बंद आढळले. परिणामी ऑक्टोबर २०२४ मध्ये मुलगी हरवल्याची तक्रार कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली.
पोलिस तपास
तपासात काका व मावशी घरातून फरार असल्याचे आढळले. तब्बल १० महिन्यांच्या शोधानंतर प्रथम मावशीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर ११ ऑगस्ट २०२५ रोजी काका प्रथमेश उर्फ आमर प्रविण कांबरी याला नेरळ धामोते येथील चाळीतून अटक करण्यात आली. चौकशीत काकाने मुलीचा खून केल्याची कबुली दिली.
कबुलीजबाब आणि मृतदेहाची विल्हेवाट
काकाने सांगितले की, मुलीने दोनदा कपड्यात शौच केल्यामुळे रागाच्या भरात त्याने मारहाण केली, ज्यामुळे तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. घाबरल्याने डॉक्टरकडे नेले नाही. त्यानंतर पत्नी (मावशी) सोबत मृतदेह गादीत गुंडाळून रात्रीच्या अंधारात कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील भाऊसाहेब राऊत विद्यालयाजवळील झाडीत टाकला.
पोलिस कारवाई
काकाच्या कबुलीजबाबानंतर दाखवलेल्या ठिकाणाहून पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष जप्त केले. या कारवाईत पी.आय. गणेश न्हायदे, ए.पी.आय. भालेराव, पी.एस.आय. मदने, पो.ह. किरण मुसळे, खरात तसेच नेरळ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शेमडे, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, कंपाउंडर आणि पंच उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *