पोलादपूर शहरातील शिवसेना महिला आघाडी पुरस्कृत स्पर्धेत शहरातील रुक्मिणी ग्रुपच्या महिलांनी विजेतेपदाची 25 हजार रुपये रक्कम आणि ट्रॉफी पटकावली आहे. मंत्री पत्नी सुषमा गोगावले आणि मंत्रीकन्या शीतल गोगावले-कदम, कोमल गोगावले यांच्या आवाहनानुसार शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो महिलांनी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद लुटला. प्रसंगी टीव्ही चॅनलवरील आघाडीच्या अभिनेत्री रेश्मा शिंदे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
पोलादपूर तालुका शिवसेना महिला आघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या मंगळागौरी स्पर्धेवेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा नीलिमा घोसाळकर, जिल्हा उपाध्यक्षा सपना मालुसरे, रायगड जिल्हा परिषद सदस्या अपर्णा घोसाळकर, विधानसभा अध्यक्षा प्रेरणा सावंत, पोलादपूर तालुकाप्रमुख सुवर्णा संदेश कदम, शहर प्रमुख व नगरसेविका अस्मिता पवार, उपशहर प्रमुख सुमन महाडिक, सिद्दीका लोखंडे व जान्हवी मोरे, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका सोनाली गायकवाड, नगरसेविका स्नेहल मेहता व स्वीकृत नगरसेविका मृगया शहा, विभाग प्रमुख गीता दळवी, उपतालुकाप्रमुख आशा खेडेकर व चेतना पवार, शाखाप्रमुख विकिता सुतार, माजी सभापती अर्चना कुंभार, सपना मोदी, नीलम मोरे आधी महिला पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा संघटक व रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्यासह तालुकाप्रमुख निलेश अहिरे हे देखील उपस्थित होते. भाजपच्या महिला नगरसेविका अंकिता निकम यांचा यावेळी सुषमा गोगावले यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
या मंगळागौरी स्पर्धेमध्ये पोलादपूर शहरातील साईलीला ग्रुपच्या महिलांनी उपविजेता पदाचे 20 हजार रुपयांचे पारितोषिक आणि ट्रॉफी पटकावली तर सवाद येथील रागिणी ग्रुपच्या महिलांनी 15 हजार रुपयांचे तिसरे पारितोषिक आणि ट्रॉफी प्राप्त केली. यावेळी पाच लकी ड्रॉ पध्दतीने महिलांच्या संघांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली तसेच 3 हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके स्त्रीशक्ती आणि शिवकन्या ग्रुपच्या महिलांना प्रदान करण्यात आली.
महिलांच्या तुडूंब उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या मंगळागौरी नृत्यस्पर्धेमध्ये मंत्री भरतशेठ गोगावले स्टायलीत नॅपकिन फडकवित केलेल्या नृत्यावेळी अभिनेत्री रेश्मा शिंदे यांनीदेखील थिरकण्याचा आनंद घेतला.