तालुक्यातील क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावेळी गेल्या अनेक वर्षांपासून जागेअभावी क्रीडांगणाचा प्रश्न भेडसावतो. रानबाजिरे धरणाजवळ ७ एकर जागा उपलब्ध आहे. मंत्री उदय सामंत व पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या सहकार्यातून लवकरच क्रीडांगण व हेलीपॅडसाठी तांत्रिक बाबींची पूर्तता तहसीलदार यांनी केल्यास त्यासाठी निधी देण्याची जबाबदारी घेणार. लवकरच खऱ्या अर्थाने हक्काचे क्रीडांगण मिळेल, अशी ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांनी पोलादपूर तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी दिली.
गेल्या काही वर्षांपासून रानबाजिरे धरणालगतच्या जमिनीवर विविध प्रकारच्या उपक्रमांची चर्चा होऊन हवेत विरून गेल्या असताना रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांनी याच जमिनीवर क्रीडांगण व हेलिपॅड उभारण्यासाठी अंगुलीनिर्देश केला आहे. ब्रह्मध्वजा अकॅडमी दिविल येथे दोन दिवसीय पावसाळी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनपर भाषणात सभापती चंद्रकांत कळंबे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांच्यासमवेत पंचायत समितीच्या उपसभापती अनिता भिलारे, सदस्य अनिल दळवी, तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दिप्ती गाट, गटशिक्षणाधिकारी विजय कानेकर, बांधकाम विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर कांबळे, ब्रह्मध्वजा सोशल अकॅडमीचे संस्थापक शशांक यादव, संयोग प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय दरेकर, शारीरिक शिक्षण संघटना अध्यक्ष तथा मुख्याध्यापक राजू जाधव, क्रीडा समन्वयक दीपक सकपाळ, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विलास जाधव, मुख्याध्यापक सुनील शिंदे, मुख्याध्यापक टी. डी. जाधव, महिला क्रीडा प्रतिनिधी शुभांगी उतेकर, माजी मुख्याध्यापक सुखदेव मोरे आदींसह क्रीडा समितीचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांनी, पूर्वजांनी गरिबांची मुले शिकावीत यासाठी स्वतः वर्गणीतून आणि जागा देऊन शाळा काढल्या. मात्र, मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्यामुळे स्थलांतराचा परिणाम थेट शिक्षणावर झाला. त्यामुळे पटसंख्या अभावी शाळा बंद पडत आहेत. ही शोकांतिका खेद व्यक्त करून पटसंख्या वाढीसाठी सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा मानस व्यक्त करून पटसंख्या स्थिर राहील. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर सर्वांनी काम करावे. शिक्षणासोबत गुणवत्ता वाढली पाहिजे; यावर्षी जिल्ह्यात 322 चे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. आगामी काळात ही संख्या 3 हजारांवर पोहोचवावी, असेही आवाहन केले.
तर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार कपिल घोरपडे यांनी मनोगतात, शिक्षकच विद्यार्थ्यांचे पालक असतात. त्यांच्याकडून जास्तीत जास्त ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला तरच आयुष्यात प्रगती होईल. शिक्षक हे नेहमीच आई-वडिलांच्या रूपात असतात कारण शिक्षक स्वतःच्या मुलापेक्षाही विद्यार्थ्यांसाठी वेळ देतो कारण शिक्षक हा देवाने पाठवलेला एक दूत असतो, असे भावनिक उदगार काढून विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी लावणे व्यायाम करणे अभ्यासाची वेळ ठरवा असे मौलिक मार्गदर्शन करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.