‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात भक्तिमय वातावरणात विसर्जन सोहळ्याची सांगता

माणगांव  | नरेश पाटील
अनंत चतुर्दशीच्या मुख्य आणि गणेशोत्सवाच्या अंतिम विसर्जनदिनी माणगांव नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक १२ येथील गोद नदी विसर्जनस्थळी गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विधिवत विसर्जन करण्यात आले. दिवसभर भाविकांच्या उत्साहाने गजबजलेल्या या विसर्जनस्थळी आतापर्यंत सुमारे १० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
गणेशमूर्ती घेऊन भाविक विसर्जनस्थळी दाखल होताच आरती, पूजाविधी आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’, ‘एक, दोन, तीन, चार… गणपतीचा जयजयकार’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. गणरायाला निरोप देताना भाविकांच्या चेहऱ्यावर भक्तिभावासोबतच भावनिक वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी माणगाव नगरपंचायतीचे सभापती अजित तर्लेकर यांनी विसर्जनस्थळी भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. परिसरातील स्वच्छता, विसर्जनासाठीची पूर्वतयारी, भाविकांसाठी उपलब्ध सुविधा तसेच विसर्जन प्रक्रिया सुरळीत सुरू आहे की नाही, याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. भाविक गणेशमूर्ती घेऊन विसर्जनस्थळी पोहोचताच तर्लेकर यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीफळ अर्पण करून त्यांनी गणरायाचे आशीर्वाद घेतले.
यानंतर माणगाव नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी गणेशमूर्ती अत्यंत काळजीपूर्वक हाताळत त्या नदीच्या खोल पात्राकडे नेऊन विधिवत विसर्जन केले. विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीकडून परिसराची स्वच्छता, आकर्षक रंगरंगोटी, हॅलोजन दिव्यांची व्यवस्था तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली होती. यावेळी नगरपंचायतीचे अधिकारी प्रमोद मोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणरायाला भावपूर्ण निरोप देत वॉर्ड क्रमांक १२ येथील गणेश विसर्जन सोहळ्याची सांगता झाली.