तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता गेल्या अनेक पिढयांपासून सुरत, अहमदाबाद, सुरत, मुंबई, ठाणे, पुणे, पनवेल, महाबळेश्वरला रोजगारासाठी स्थलांतरीत झाली आहे. तिकडे कोण-काय करतंय, किती सुखी जीवन जगतंय याची कल्पना आपणास असून त्या जनतेला जरी पुन्हा गावी आणणे शक्य नसले तरी कृषीविकासाद्वारे रोजगारसंधी निर्माण करण्यासाठी धरणप्रकल्प, रस्ते, सरकारी अनुदानाच्या योजनांचा तळागाळातील व्यक्तींना लाभ मिळण्याकामी सर्वांगिण विकासाचे आटोकाट प्रयत्न येत्या पिढया मायभूमीतच राहण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करू, असा विश्वास रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारजमीन मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला.
पोलादपूर येथे युवासेना आणि सिध्देश शेठ मित्रमंडळाच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मोफत बियाणे वाटपाचा कार्यक्रम कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला असता मंत्री ना. भरतशेठ गोगावले बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तहसिलदार कपिल घोरपडे, सपोनि आनंद रावडे, गटविकास अधिकारी दिप्ती गाट, दापोली कृषी विद्यापिठाच्या रेपोली बीज अन्विक्षा केंद्राचे डॉ.प्रशांत निगडे आणि पोलादपूर तालुका कृषी विभागाचे भरत कदम आदींसह भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष तुकाराम केसरकर, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, उद्योजक रामदास कळंबे, नायक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील मोरे, सिध्दीविनायक सोसायटीचे दत्ता मोरे तसेच नगरसेविका व महिला पदाधिकारी तसेच युवासेना पदाधिकारी संजय कळंबे व अन्य उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री ना.भरतशेठ गोगावले आणि राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांचा 1 जूनरोजी वाढदिवस असल्याने पूर्वदिनी दोन्ही नेत्यांच्याहस्ते केक कापून युवासेनेने वाढदिवस साजरा केला.
प्रारंभी दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापिठाच्या रेपोली बीज अन्विक्षा केंद्राचे डॉ.प्रशांत निगडे यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने शेती केल्यास भातशेतीचे उत्पादन वाढेल, अशी माहिती दिली. यावेळी कृषी पर्यवेक्षक भरत कदम यांनी शेतकऱ्यांनी संकरित बियाणांसह प्रक्रिया केलेल्या बियाणांचा वापर करून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन केले. यावेळी राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी, सिध्देश शेठ मित्रमंडळ आणि युवासेनेच्या तरूणांनी शेतकऱ्यांना जगविण्याचा विचार स्विकारला म्हणजेच शिवसेनेचे संस्कार त्यांच्यावर झाल्याचे सांगून उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी तहसिलदार कपिल घोरपडे यांनी, इकेवायसी न केल्याने 800 शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या अनुदानाची रक्कम उपलब्ध असूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन केले.
यावेळी ना.भरतशेठ गोगावले यांनी भाषणात पुढे बोलताना, युवासेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जी लोकोपयोगी कामे केली आहेत ते पाहता शिवसेनेचा विचार जनमानसात रूजविण्यासाठी योग्य काम करीत असून अशा प्रकारच्या कामांसाठी आपण नेहमीच सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृउबासचे संचालक लक्ष्मण मोरे यांनी केले. याप्रसंगी सुमारे 500 हून अधिक शेतकऱ्यांना सुवर्णा व तिलक कोलम जातीच्या तांदूळाचे बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले.