पेण-कोप्रोलीचे ज्येष्ठ चित्रकार किशोर ठाकूर यांना राज्य शासनाचा ‘वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

रायगड | अमुलकुमार जैन
चित्रकलेतील प्रदीर्घ आणि निष्ठावान कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार’ सन २०२३–२४ या वर्षासाठी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील कोप्रोली येथील ज्येष्ठ चित्रकार किशोर ठाकूर यांना जाहीर झाला आहे. या निवडीमुळे रायगड जिल्ह्याचा मान उंचावला असून कला क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रातील दृश्य कला क्षेत्रात आयुष्यभर योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाने २०१९–२० पासून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सुरू केला आहे. चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक जाण, निसर्गसौंदर्य आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा सुरेख संगम साधत किशोर ठाकूर यांनी अनेक वर्षे सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राज्य शासनाने त्यांची या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.
या पुरस्काराचे वितरण १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता मुंबईतील ऐतिहासिक जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणार आहे. ६५ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाच्या (कलाकार विभाग) उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते किशोर ठाकूर यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभाकडे राज्यभरातील कला रसिकांचे लक्ष लागले आहे.
किशोर ठाकूर यांनी अनेक दशकांपासून चित्रकला क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या चित्रांमध्ये निसर्ग, ग्रामीण जीवन, सामाजिक वास्तव आणि कल्पनाशक्तीचा अनोखा संगम दिसून येतो. त्यांच्या कलाकृतींना विविध प्रदर्शनांमध्ये दाद मिळाली असून कला क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यामुळेच कलेला वाहिलेल्या त्यांच्या आयुष्याचा गौरव म्हणून राज्य शासनाने त्यांना हा सर्वोच्च सन्मान जाहीर केला आहे.
दरम्यान, या पुरस्काराच्या घोषणेनंतर रायगड जिल्ह्यासह पेण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कला क्षेत्रातील मान्यवर, सहकारी कलाकार तसेच विविध संस्थांकडून किशोर ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे यांनीही पत्राद्वारे त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
या सन्मानामुळे रायगड जिल्ह्याच्या कला क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून जिल्ह्यातील उदयोन्मुख कलाकारांसाठीही हा मोठा प्रेरणादायी क्षण ठरत आहे.