मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 कातळी भोगावनजिक भुयारी मार्गाने कोकणाकडे व मुंबईकडे वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून सतत खचणाऱ्या कशेडी घाटातील ‘डेंजर झोन’चे कायमस्वरूपी दुरूस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कशेडी घाटात जुन्या मुंबई गोवा महामार्गावरील भोगाव गावाच्या हद्दीत 2005 च्या अतिवृष्टी काळात 105 फूट लांब रस्ता खचला. या रस्त्यावर दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लाखो रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या डागडुजीनंतरदेखील रस्ता खचण्याचे सातत्य कायम राहिले. या 105 फूट खचलेल्या रस्त्याची ओळख कशेडी घाटातील ‘डेंजर झोन’ अशी होऊ लागली असताना त्यावरील मलमपट्टीवरील वारेमाप उधळपट्टीचीदेखील माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांनी वेळोवेळी माहिती घेऊन चर्चा घडविल्याचे समजून आले.
रायगडचे पालकमंत्री तसेच लोकसभा खासदार झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी आतापर्यंत तीन-चारवेळा या सतत खचणाऱ्या कशेडी घाटातील ‘डेंजर झोन’रस्त्याची पाहणी करून संबंधितांना दुरूस्तीचे आदेश दिले. मात्र, नेहमीच तातडीने तात्पुरती डागडुजी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळ मारून नेल्याने यावर्षापासून होणाऱ्या कायमस्वरूपी दुरूस्ती कामाची व्यवस्था खासदार तटकरे यांच्याकडून पाहिली जाईल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
मात्र वर्षअखेरीस या रस्त्यावर नेहमीप्रमाणे डागडुजी न करता कायमस्वरूपी काँक्रिटीकरण करून धूपप्रतिबंधक तंत्राचा वापर करत कशेडी घाटातील ‘डेंजर झोन’मधील रस्ता दुरुस्ती होणार असल्याने गेल्या 20 वर्षाची आर्थिक उधळपट्टी कायमची थांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या कामाला महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत युध्दपातळीवर सुरुवात करण्यात झाली आहे. मुंबईतील जय भारत कंपनीमार्फत दरीच्या बाजूकडून सुमारे 100 मीटर लांब व 15 फूट उंच काँक्रीटची भिंत बांधण्यात येणार असून 6 मीटर रुंद काँक्रिटीकरण करण्याची उपाययोजना आखण्यात आली आहे. याबरोबरच डोंगर भागाकडून कातळाच्या बाजूने या ठिकाणी पावसाचे मुरणारे पाणी योग्य पध्दतीने नियोजन करून गटार काढण्यात येणार आहे. या दुरूस्ती कामामुळे दरवर्षी ‘डेंजर झोन’मधील रस्ता खचण्याच्या घटनांचे सातत्य थांबणार आहे.
सन 2005 पासून कशेडी घाटातील ‘डेंजर झोन’मधील रस्ता दरवर्षी खचण्याचे सातत्य आणि दरडी कोसळण्याचे धोका कायम राहिला आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे कातळी भोगाव येथील भुयारी मार्गातून राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक सुरू झाल्यानंतर जुन्या कशेडी घाटरस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. त्यामुळे यंदा या कशेडी घाटातील डेंजरझोन रस्त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे शक्य होणार आहे.